मुंबईत ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती - सुधीर मुनगंटीवार




मुंबई दि. ५ : मुंबई येथे ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची  निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्चून तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्चून  कांदळवन उद्यान विकसित केले जात असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
गोराई कांदळवन
गोराई कांदळवन उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, पक्षी निरीक्षण मनोरा, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन, यासारखी कामे प्रस्तावित असून २०२१ च्या दीपावलीच्या आधी हा प्रकल्प पर्यटकांसाठी उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे.
                                        दहिसर कांदळवन
दहिसर कांदळवन उद्यानाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कांदळवनाची जैवविविधिता  खुप मोठी  असून येथे  कांदळवनाच्या ११ प्रजाती आढळतात. त्यामुळे संशोधन आणि मनोरंजन या दृष्टीने हा परिसर पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त  ठरणार आहे.  येथे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. या उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, जैवविविधतेसह आभासी संग्रहालय, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्य योजनेतून हा प्रकल्प राबविला जात असून  ऑक्टोबर २०२२ पर्यंत हे उद्यान  पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदळवने
राज्यात एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदळवने असून यात १७ हजार हेक्टर क्षेत्र हे शासकीय  मालकीचे तर १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदळवने खाजगी जमीनीवर आहेत.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर