कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेत समन्वयाने काम करा




जिल्हाधिकारी हृषीकेश मोडकयांचे आवाहन 
·        जिल्हा समन्वय समितीची सभा
वाशिम, दि. ११ : जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम व असंसर्गजन्य रोगप्रतिबंध जागरूकता अभियान १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०१९ या कालावधीत संयुक्तपणे राबवायचे आहे. याकरिता संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए. जी. हाके, डॉ. एस. एच. परभणकर, डॉ. राठोड, आर. जे. राजगुरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी एस. डी. लोनसुने, श्री. ठाकरे, आशा कार्यक्रम समन्वयक अनिल उंदरे, राम सरकटे, समाज कल्याण विभागाच्या श्रीमती आर. एस. ठाकरे आदी सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाची नोंद शासकीय यंत्रणेकडे होऊन त्याला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने आगामी कुष्ठरुग्ण शोध अभियान व क्षयरुग्ण शोध मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. मोहीम काळात शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये व इतर माध्यमातून कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांची माहिती संकलित करण्यात यावी. तसेच घरोघरी जावून रुग्णांचा शोध घ्यावा. या मोहिमेदरम्यान आढळून येणाऱ्या प्रत्येक कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाला नियमानुसार उपचार सुरु करून त्याला पूर्णतः बरे  करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. या दरम्यान असंसर्गजन्य रोगांविषयी सुद्धा जनजागृती करण्यात यावी.
डॉ. हाके यांनी क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियानाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, एकूण १० लक्ष ६८ हजार २१२ लोकांची मोहिमेदरम्यान तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता १०९४ पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच २३४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये १ महिला व १ पुरुष सदस्य असणार असून ही पथके घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगविषयी संपूर्ण शारीरिक तपासणी करणार आहेत. तसेच नागरिकांना असंसर्गजन्य रोगांविषयी माहिती देवून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करतील.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश