‘स्वयंम’ योजनेत 7381 अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य
मुंबई, दि. 5 : पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्वयंम’योजनेंतर्गत गेल्या 4 वर्षांत 7 हजार 381 अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 28 कोटी रूपयांचे सहाय्य करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम वितरित केली जाते.
या योजनेंतर्गत महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना निवास, आहार, निर्वाह तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्याकरिता अर्थसहाय्य देण्यात येते.
2018-19 या शैक्षणिक वर्षापासून तालुका स्तरावरील इ.12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे. केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या,सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राथम्याने दिला जाईल. योजनेंतर्गत अर्जाकरिता संकेतस्थळ :-http://swayam.mahaonline. gov.in पहावे.
Comments
Post a Comment