लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
·
कुटुंबातील
व परिसरातील मतदारांना करणार आवाहन
·
‘स्वीप’अंतर्गत
सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
वाशिम,
दि. २५ : आगामी
विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध
उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार
मीना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृतीविषयक
उपक्रमांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सुध्दा सहभागी होत आहेत. त्यानुसार
आज जिल्ह्यातील विविध विद्यालये, महाविद्यालयांमधील सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थींनी
मतदार जागृतीसाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
मतदारांना आपल्या मताचे महत्व पटवून देण्यासाठी ‘स्वीप’ समितीमार्फत विविध उपक्रम
हाती घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून या विद्यार्थ्याचे पालक व
कुटुंबातील इतर मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. याकरिता प्राथमिक व माध्यमिक
शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम
व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातील पहिल्या टप्प्यात आज
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सकाळी परिपाठाच्या
वेळी मतदार जागृतीसाठी प्रयत्न करून कुटुंबातील व परिसरातील मतदारांना मतदानासाठी
प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली. ‘स्वीप’चे सहाय्यक नोडल अधिकारी तथा जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) अंबादास मानकर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक
यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
Comments
Post a Comment