एक राज्य, एक ई-चलान 32 जिल्ह्यात प्रकल्प सुरु
मुंबई, दि. 5 : गृह विभागाने 32 जिल्ह्यात ‘एक राज्य एक ई-चलान’ हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम व इतर माहिती पाहण्यासाठी महाट्रॅफिक ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी व मुंबई व्यतिरिक्त इतर पोलीस दलासाठी वेगळे असे दोन ॲप आहेत. हे ॲप आयओएस व अँड्रॉइड मोबाईलवर डाऊनलोड करता येते.
मुंबई ट्रॅफिक ॲप, महाट्रॅफिक ॲप या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई- चलानची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. चलानची माहिती घेणे, ई चलानचा दंड भरणे यामुळे सोईचे झाले आहे.
या ॲप्लिकेशनमधील, ‘माय व्हेइकल’ या विभागात दंड आकारण्यात आलेल्या वाहनाची माहिती देण्यात येईल. वाहनाचा क्रमांक व त्याचा चेसिस/इंजिन क्रमांक टाकल्यास ही माहिती दिसेल. ‘माय ई- चलान’ या विभागात वाहनाच्या चलानबद्दलची माहिती दिसेल. चलानच्या दंडाची रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या ॲप्लिकेशनमुळे चलान प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण झाली असून वाहतूक नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत आहे.
Comments
Post a Comment