निवडणूक विषयक विविध बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा



·        मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना
वाशिम, दि. २५ : विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून यादिवसापासूनच निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली पूर्वतयारी आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, वाशिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, रिसोड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण नोडल अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार शीतल वाणी-सोलट, तहसीलदार अधीक्षक प्रशांत जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी विनय राठोड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना किमान आवश्यक सुविधा पुरविण्याल्या जाणार आहेत. याकरिता सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबधित गट विकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी. तसेच प्रत्येक मतदान केंद्राची किमान आवश्यक सुविधा विषयक टिप्पणी तयार करावी. यामध्ये सर्व संबंधितांचे संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्राध्यक्ष व इतर सर्व मतदान अधिकाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचे एकत्रित प्रशिक्षण आयोजित न करता ५०-५० च्या गटाने प्रशिक्षण द्यावे. तसेच या प्रशिक्षानंतरही कोणाला काही शंका असल्यास त्याचे समाधान करावे. प्रत्यक्ष मतदानादिवशी कोणत्याही मतदान अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे गोंधळ होवू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना टपाली मतपत्रिकांचे वेळेत वाटप करावे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले. नामनिर्देशनपत्र स्वीकारताना निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश