विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा



वाशिम, दि. १२ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी विशेष मतदार यादी संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम, मतदान केंद्रावरील सुविधा, कायदा व सुव्यवस्था यासह सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या इतर बाबींचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, अनुप खांडे, जयंत देशपांडे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची अजूनही संधी आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) आपल्या मतदान केद्र क्षेत्रातील प्रत्येक घरातील नवमतदार व महिला मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये असल्याचे खात्री करून घ्यावे. ज्यांनी अद्याप नाव नोंदविलेले नाही, अशा मतदारांची नाव नोंदणी करून घ्यावी. तसेच मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलनाची कार्यवाही गतीने राबवून सर्व मतदारांची छायाचित्रे संकलित करावीत. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १५ सुविधा सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त केल्या जाणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी वेळोवेळी मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जावे. जेणेकरून प्रत्यक्ष मतदानादिवशी होणारा गोंधळ टाळणे शक्य होईल, असे श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्ह्यात करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. ते म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश