14 हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना
कुपोषण कमी करण्यात यश
राज्यातील 6 हजार 962 गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आत्तापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील कुपोषण कमी होण्यास झाला आहे.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नावाने अमृत आहार योजना सुरु करण्यात आली आहे. 105 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत या योजनेमध्ये दरमहा सुमारे 1.04 लाख गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळचा आहार तसेच 7 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या दरमहा सुमारे 6.01 लाख बालकांना या योजनेमार्फत अंडी, केळी चा लाभ देण्यात आला आहे.
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना अमृत आहार योजनेतंर्गत सकस आहार देण्यात येत असल्याने जन्माला येणा-या बालकाच्या वजनात वाढ होऊन कुपोषण कमी होण्यास या योजनेचा फायदा झाला आहे.
या योजनेच्या निधीचे आहार समितीस थेट वितरण करण्यासाठी संगणकीकृत “अमृतप्रणाली” विकसित करण्यात आली आहे. या योजनेमध्ये अनूसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजनाक्षेत्रातील अंगणवाड्यांतर्गत 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्रती दिन शाकाहारी मुलांना 2 केळी व मांसाहारी मुलांना 1 उकडलेले अंडे आठवडयातून 4 वेळा म्हणजेच महिन्यातून 16 दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
००००
Comments
Post a Comment