राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने साधला स्वयंसेवी संस्थांशी संवाद




वाशिम, दि. ३० : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने आज नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून १ ऑगस्ट २०१९ रोजी होणाऱ्या विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या जनजागृतीबाबत माहिती घेतली. तसेच शिबिरामध्ये तक्रार नोंदणीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या चमूमध्ये आयोगाच्या वरिष्ठ तांत्रिक तज्ज्ञ शाइस्ता शाह, भावना बजाज, सुदीप चक्रवर्ती, कपिल शर्मा यांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वाशिम येथे १ ऑगस्ट रोजी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. सकाळी ९ वाजेपासूनच तक्रार नोंदणी सुरु होणार आहे. शिबिरामध्ये सर्व घटकातील मुलांना आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी अशा अन्याय, अत्याचारग्रस्त बालकांची तक्रार शिबिरामध्ये नोंदविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती शाह यांनी केले. यावेळी त्यांनी स्वयंसेवी संस्थांकडे शिबिरासाठी आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती घेवून तक्रार निवारण शिबिराच्या दिवशी स्वयंसेवी संस्थांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. तसेच यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या या चमूने जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांची भेट घेवून शिबिराच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने चर्चा केली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे