खरीप पिक कर्ज वितरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वाशिम, दि. ०८ : खरीप हंगाम पिक कर्ज वितरणाच्या
अनुषंगाने आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात सर्व बँक प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली
होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी बँक निहाय पिक कर्ज वाटपाचा आढावा
घेतला.
बैठकीला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी
बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक विजय खंडरे
यांच्यासह सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप पिक कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी
जिल्हाधिकारी श्री. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी बँक प्रतिनिधींची
आढावा बैठक आयोजित केली जात आहे. आज झालेल्या बैठकीत कर्ज वितरणास गती देण्यासाठी
बँकांमार्फत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी झाल्याने पात्र ठरणाऱ्या
प्रत्येक शेतकऱ्याला पिक कर्जाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. तसेच जे शेतकरी पिक
कर्जासाठी पात्र आहेत, मात्र काही कारणांमुळे बँकिंगच्या प्रवाहात आलेले नाहीत,
त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बँकेने विशेष प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील प्रत्येक
इच्छुक व पात्र शेतकऱ्याला पिक कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट
असून त्यासाठी बँकांनी सहकार्य करावे.
शेतकऱ्यांच्या गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी चालना
देण्यासाठी राज्य शासनामार्फत योजना राबविली जात आहे. या अंतर्गत प्रत्येक गटाला १
कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प मंजूर केला जाणार असून जिल्ह्यात अशा २० गटांना मान्यता
मिळाली आहे. या शेतकरी गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पुढाकार
घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी केले. तसेच या योजनेविषयी
बँकांना सविस्तर माहिती देण्यासाठी सर्व बँक प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक आयोजित करण्याच्या
सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिल्या.
Comments
Post a Comment