महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रज्ज्वला योजना उपयुक्त - आमदार राजेंद्र पाटणी





प्रज्ज्वला योजनेंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण उत्साहात

·        राज्य महिला आयोगामार्फत आयोजन
वाशिम, दि. २६ : महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी राज्य शासनाने प्रज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारून महिलांना उद्योगिनी बनण्यास मदत केली जाणार आहे. महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. राज्य महिला आयोग व राज्य शासन यांच्यावतीने आज स्वागत लॉन येथे आयोजित प्रज्ज्वला योजनेंतर्गत बचत गटांचे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रज्ज्वला समिती सदस्य उषा वाजपेयी, अर्चना डेहनकर, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर, प्रभारी गट विकास अधिकारी डॉ. निलेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटणी म्हणाले, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवीत आहे. उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान ही त्याचीच उदाहरणे आहेत. आता राज्य शासनाने महाराष्ट्राला धुरमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उज्ज्वला योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलेला या योजनेतून गॅस जोडणी दिली जाणार आहे. मुलगी शिकली तर कुटुंबाची आणि देशाची प्रगती होईल, त्यामुळे बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनाही केंद्र शासनाने सुरु केली आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून छोटे-छोटे उद्योग उभारून महिलांना उद्योगिनी बनविण्यासाठी प्रज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. या योजनेचा लाभ घेवून महिलांनी आपला बचत गट सक्षम बनवावा. कुटुंब आणि देश घडविण्याचे काम महिलाच करू शकते, त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वाशिम व कारंजा येथे बचत गटांसाठी भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती वाजपेयी म्हणाल्या, बचत गटांतील महिलांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी प्रज्ज्वला योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांना उद्योगिनी बनवून स्वयंपूर्ण बनविण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर प्रशिक्षण घेवून विविध योजनांची माहिती बचत गटातील महिलांना देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात एक जिल्हा, एक वस्तुअसे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजारउभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य शासनामार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.
श्रीमती डेहनकर म्हणाल्या, विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून प्रथमच प्रज्ज्वला योजनेंतर्गत महिला बचत गटांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना विविध कायदे, केंद्र व राज्य शासन महिलांसाठी राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती घेवून लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘उमेद’च्या बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘अस्मिता’ योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री. खंडरे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महिलांना केलेल्या आवाहनाची ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तसेच आयोगाने प्रकाशित केलेल्या सखी संवाद, कायदे तुमच्यासाठी, प्रज्ज्वला यापुस्तिकांचे वाटप बचत गटाच्या महिलांना करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वानखडे यांनी केले. तर सूत्रसंचालन उज्ज्वला मोरे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे