शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढा - गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील
·
शिक्षक
सहविचार सभा
वाशिम, दि. २६ : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवृत्ती उपदान
अंशदायी योजनेबाबत, त्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाबाबत, शिक्षक बदलीत
त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आणि पदोन्नतीच्या प्रकरणासह अन्य प्रश्न तातडीने
निकाली काढावेत, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
आज
२६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित शिक्षकांच्या
सहविचार सभेत डॉ. पाटील बोलत होते. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी के. आर. तापी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी
व्यंकटेश जोशी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या
सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर, वेतन पथकाचे अधीक्षक श्री. कदम, श्री. साठे,
सहाय्यक प्रशासन अधिकारी गजानन खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.
पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या व खाजगी शाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना
त्यांच्या निवृत्ती उपदान अंशदायी योजनेच्या पावत्या ३१ मार्च २०२० पर्यंत देण्यात
याव्यात. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची पदोन्नतीची प्रकरणे बिंदू नामावली प्राप्त
करून घेवून निकाली काढावीत. इयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश
पद्धतीने राबवावी. माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाच्या त्रुटी दूर कराव्यात.
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग मोठ्या
प्रमाणात असावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा
परिषदेच्या ज्या शाळांच्या इमारती नादुरुस्त आहेत, त्या शाळांची अ, ब, क, ड
याप्रमाणे वर्गवारी करून दुरुस्तीची कामे तातडीने करावीत, असे सांगून डॉ. पाटील
म्हणाले, जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या मागणीनुसार त्यांची वेतन खाती स्टेट
बँकेत उघडावीत. म्हणजे त्यांना बँकांचे विविध लाभ घेता येतील. शिक्षकांची प्रलंबित
असलेली वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तातडीने अदा करण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे.
तसेच शिक्षकांच्या सेवापुस्तकात नोंदी घेण्यासाठी तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन
करावे. वैद्यकीय बिले जास्त दिवस प्रलंबित राहू नये, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी
यांनी तातडीने तांत्रिक मान्यता द्यावी. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
यांनी ३ लाखापर्यंतची बिले काढण्यासाठी तातडीने मंजुरी प्रदान करावी. तसेच
वैद्यकीय अग्रिम देखील त्यांना देण्यात यावा, असे ते म्हणाले.
ऑनलाईन
शिक्षक भरतीमध्ये ज्या शिक्षकांवर अन्याय झाला असे वाटत असेल त्यांना न्याय
देण्यासाठी शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, शिक्षकांची
निवड प्रकरणे जुन्या निकषानुसार निकाली काढावीत. अल्पसंख्याक क्षेत्रीय
कार्यक्रमांतर्गत पायाभूत क्षेत्रामध्ये वर्ग खोल्यांचे बांधकाम तातडीने
करण्यासाठी ५० टक्के निधीची मागणी करण्यासाठी पाठपुरावा करावा. ग्रामीण भागातील
मुलींना शिक्षणात अडथळा येवू नये, यासाठी गाव ते शाळा असलेल्या गावांदरम्यान एसटी
बसेसने ये-जा करण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना बसेस उपलब्ध
व्हाव्यात, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे शिक्षण विभागाने पाठपुरावा करावा.
ज्या शिक्षकांचे समायोजन झाले असेल तर पूर्वीच्या शाळेत जर पद रिक्त असेल तर त्या
शिक्षकाला त्या शाळेत नियुक्ती देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असे
सांगितले.
प्रारंभी
कारगिल विजय दिनानिमित्त शहीद झालेल्या जवानांना यावेळी उपस्थितांनी आदरांजली
अर्पण केली. या सहविचार सभेला प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना यामध्ये भाजपा
शिक्षक आघाडी, अमरावती विभागीय शिक्षण संस्था महासंघ, महाराष्ट्र उर्दू शिक्षक
संघटना, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, साने गुरुजी प्राथमिक शैक्षणिक सेवा
संघ, पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, शिक्षक संघर्ष संघटना व
विजुक्टाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने डॉ.
पाटील यांना दिली. काही शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी सुद्धा त्यांच्या
मागण्यांची निवेदने दिली.
कारगिल
विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार
२०
व्या कारगिल विजय दिनानिमित्त गृह तथा माजी सैनिकांचे कल्याण राज्यमंत्री डॉ.
रणजीत पाटील यांच्या हस्ते यावेळी माजी सैनिकांचा हार, शाल व श्रीफळ देवून सत्कार
करण्यात आला. यामध्ये हरिभाऊ बुधनेर, नारायण घोडे, सुरेश शेंडे, प्रकाश लाटे,
रामराव देशमुख, शंकरराव पवार, शंकरराव पैठणकर, आमनराव कहाकर, नारायण सानप यांचा
समावेश होता.
Comments
Post a Comment