पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय समाधान शिबीर



·         सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजन
·         १५ जुलैपर्यंत तहसील कार्यालयात निवेदने स्वीकारणार

वाशिम, दि. ०५ : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे जिल्हास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता नागरिकांनी ६ ते १५ जुलै २०१९ या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयात आपल्या तक्रारी व निवेदने सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
समाधान शिबिरासाठी प्राप्त झालेल्या तक्रारी तहसील कार्यालयामार्फत संबंधित विभागांकडे पाठविल्या जातील. त्यावर संबंधित विभागांनी कार्यवाही करून ३१ जुलै २०१९ पर्यंत अंतिम अहवाल तयार करावयाचा आहे. २ ऑगस्ट रोजी विभागनिहाय एकत्रित टिप्पणी सादर केली जाणार आहे. या अनुषंगाने वाशिम येथे जिल्हास्तरीय समाधान शिबीर २८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. तरी नागरिकांनी १५ जुलै पर्यंत आपल्या समस्या, तक्रारीविषयीची निवेदने संबंधित तहसील कार्यालयात सादर करावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर