महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट गावांमधील कामांना गती द्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
·
जिल्हा
अभियान परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
·
अभियानात
समाविष्ट तीन गावांच्या आराखड्यास मंजुरी
वाशिम, दि. ०२ : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन
अभियानात समाविष्ट गावांमध्ये प्रस्तावित केलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची
कार्यवाही करावी. तसेच सर्व शासकीय विभागांनी या गावांमधील विकास कामांना
प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. वाकाटक
सभागृहात आज झालेल्या जिल्हा अभियान परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक
कुमार मीना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे, जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक कालिदास तापी, जिल्हा नियोजन
अधिकारी भारत वायाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय कृषि
अधिकारी दत्तात्रय चौधरी, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तायडे, सहाय्यक
वनसंरक्षक किशोर येळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश
राठोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्यासह विविध विभागांचे
प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, महाराष्ट्र ग्राम
सामाजिक परिवर्तन अभियानात समावेश असलेल्या कारंजा तालुक्यातील वाई, शेवती, वढवी,
मांडवा, किनखेडा, लोहारा व किसननगर या गावांच्या गाव विकास नियोजन आराखड्यानुसार
प्रस्तावित केलेली बरीच कामे अद्याप प्रलंबित आहेत. ही कामे तातडीने पूर्ण
होण्यासाठी ग्राम परिवर्तक, ग्रामसेवक यांनी समन्वयाने काम करावे. तसेच पुढील
बैठकीमध्ये प्रत्येक कामाचा सद्यस्थिती अहवाल सादर करावा.
अभियानात निवड झालेल्या सर्व सात
गावांमध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून गावातील प्रत्येक
शेतकरी या गट अथवा कंपनीसोबत जोडला जाईल, यासाठी प्रयत्न करावेत. या गावांमधील
ज्या शेतकऱ्यांनी ‘पोकरा’ अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सादर केले
आहेत, त्या अर्जांवर तातडीने निर्णय घ्यावा. सातही गावांमधील पात्र शेतकऱ्याला पिक
कर्जाचा लाभ देण्यासाठी व त्यांचा पिक विमा हप्ता भरून घेण्यासाठी मेळाव्याचे
आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना
म्हणाले, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट गावांना प्राधान्य
देवून विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास
योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेली घरकुले पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक व ग्राम
परिवर्तक यांनी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
अभियानात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मालेगाव
तालुक्यातील वाडीरामराव, कवरदरी व पिंपळशेडा या गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम
सामाजिक परिवर्तन अभियान निधीतून प्रस्तावित करावयाच्या विकास कामांना या बैठकीत
मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा समन्वयक
वासुदेव ढोणे यांनी माहितीचे सादरीकरण केले.
Comments
Post a Comment