जिल्ह्यात ८ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळ्यांचे वाटप
·
समन्वयाने
काम करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
वाशिम, दि. ३१ : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना व
बालकांना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ८ ऑगस्ट २०१९ रोजी जंतनाशक गोळ्यांचे वितरण
करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी हृषीकेश
मोडक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा झाली. या मोहिमेतून एकही
विद्यार्थी अथवा बालक वंचित राहणार नाही,
याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिकचे
शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
श्री. मोडक म्हणाले, ८ ऑगस्ट रोजी होणारी जंतनाशक गोळी वाटपाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य
विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी,
एकात्मिक महिला व बालविकास विभाग, शाळा,
महाविद्यालये व्यवस्थापन यांनी परस्पर समन्वय ठेवावा. तसेच याबाबत
सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.
डॉ.
आहेर म्हणाले, जागतिक
आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात एक ते १९ वर्षे वयोगटातील किमान ६८ टक्के बालकांमध्ये
आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे होतो. हाच कृमीदोष
रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते.
त्यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने ८ ऑगस्ट रोजी एक ते १९ वर्षे वयोगटातील
सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा
उपक्रम राबविला जाणार आहे. या गोळीचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होणार नाही.
त्यामुळे याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
जिल्ह्यातील
सुमारे ३ लक्ष ७९ हजार मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने
आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. ८ ऑगस्ट रोजी गैरहजर राहणाऱ्या मुलांना १६ ऑगस्ट
रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment