तक्रार निवारण शिबिराच्या पूर्व तयारीचा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने घेतला आढावा



·        आज विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर
वाशिम, दि. ३१ : बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आदी विषयीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत १ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पूर्व तयारीचा आज राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चमूने आढावा घेतला. तसेच शिबिरामध्ये नोंदविल्या जाणाऱ्या तक्रारींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. या चमूमध्ये आयोगाच्या वरिष्ठ तांत्रिक तज्ज्ञ शाइस्ता शाह, भावना बजाज, सुदीप चक्रवर्ती, कपिल शर्मा यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, अनुप खांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित शिबिरात सकाळी ९ वाजेपासून तक्रारींची नोंदणी सुरु होईल. तसेच सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यातील बालके, त्यांचे पालक तसेच शासकीय विभागांचे अधिकारी या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. या शिबिराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्व तयारीची माहिती आयोगाच्या चमूने घेतली. तसेच शिबिरामध्ये नोंदविण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरासाठी संबंधित सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी व्यक्तीशः उपस्थित रहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे