वृक्ष लागवड मोहिमेचा वाशिम जिल्ह्यात शुभारंभ





·        जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते धुमका येथे वृक्षारोपण
·        ३० सप्टेंबरपर्यंत ४३ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
·        नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०१ : राज्य शासनाच्यावतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते धुमका वनक्षेत्र येथे वृक्षारोपण करून झाला.
यावेळी उपवन संरक्षक सुमंत सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक किशोर येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, धुमकाचे सरपंच किशोर राठोड यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
धुमका येथील २० हेक्टर क्षेत्रावरील मिश्र रोपवन क्षेत्रावर वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत २२ हजार २२० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या वृक्ष लागवडीला आज सौ. देशमुख यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या वृक्ष लागवड मोहिमेत एनसीसीचे विद्यार्थी, स्काऊटस आणि गाईडस, शिवाजी विद्यालय, बाकलीवाल विद्यालय व राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी सौ. देशमुख म्हणाल्या, वृक्षांची संख्या कमी झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. याकरिता नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा. प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. सोळंके म्हणाले, ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४३ लक्ष ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागासह विविध शासकीय विभागांची तयारी पूर्ण झाली आहे. वन विभागामार्फत वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत १० लाख २० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून आजपासून जिल्ह्यातील वन विभागाच्या विविध प्रक्षेत्रांवर वृक्ष लागवडीस सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे