हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची महिला बचत गटांनी योजनेचा लाभ घ्यावा



वाशिम, दि. २६ : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप धोरण २०१८या धोरणानुसार महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत महिला बचत गटांना तालुका व जिल्हास्तरावर मंच उपलब्ध करून देवून व उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजनेच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एनआरएलएम), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयुएलएम), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन केलेल्या व राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानातील पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट या योजनेत सहभाग घेता येणार आहे. तालुकास्तरावरील गटांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुकास्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात येईल. ही संकल्पना उद्योगात रुपांतरीत करण्यासाठी तालुकास्तरावर मार्गदर्शन व सादरीकारणासाठी निवड करण्यात येईल. या संकल्पनेचे परीक्षण शासन निर्णयानुसार करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातून १० नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रत्येक महिला बचत गटास ५० हजार रुपयेच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल.
तालुकास्तरावर निवड झालेल्या १० नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील व त्यांना जिल्हास्तरावर सादरीकरणाची संधी देण्यात येईल. जिल्हास्तरावर ६० संकल्पनांमधून १० उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी संबंधित महिला बचत गटाला २ लक्ष रुपयेच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल. याशिवाय तालुकास्तरावरील विजेत्या महिला बचत गटांना जिल्हास्तर स्पर्धेत सहभागी होणेसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात वाशिम व मंगरूळपीर येथे २९ जुलै २०१९ रोजी, कारंजा व मानोरा येथे ३० जुलै २०१९ रोजी, रिसोड व मालेगाव येथे ३१ जुलै २०१९ रोजी तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा घेवून १५ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तालुका व जिल्हा स्पर्धेतील विजेत्या महिला बचत गटांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. तरी या योजने अंतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एनआरएलएम) अथवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयुएलएम), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बारस्कर यांनी केले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे