तक्रार निवारण शिबिराच्या पूर्व तयारीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी



वाशिम, दि. ३० : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत गुरुवार, १ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे हे शिबीर आयोजित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज नियोजन भवनला भेट देवून तक्रार निवारण शिबिराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्व तयारीची पाहणी केली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा शिबिराचे नोडल अधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा संपर्क अधिकारी सुभाष राठोड, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार उपस्थित होते.
अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी हे तक्रार निवारण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून तक्रारींची नोंदणी सुरु होईल. तसेच सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून येणारी बालके, त्याचे पालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बैठक व्यवस्था, सुनावणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पॅनेलची बैठक व्यवस्था, नोंदणी व्यवस्था आदी बाबींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्व तयारीची माहिती जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी घेतली. तसेच त्या अनुषंगाने आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे