जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम,
दि. ०४ : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत
सन २०१९-२० करिता २० टक्के जिल्हा परिषद सेस अंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना डीझेल
इंजिन पुरविणे, पीव्हीसी अथवा एचडीपीई पाईप, तुषार सिंचन संच पुरविणे तसेच ७ टक्के
वन महसूल अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना डीझेल इंजिन पुरविणे ह्या योजना १०० टक्के अनुदानावर
डी. बी. टी. तत्वावर राबविण्यात येत आहेत. योजनेच्या अर्जाचे नमुने तसेच माहिती संबंधित
पंचायत समिती कार्यालय व जिल्हा परिषदेतील जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय येथे
उपलब्ध आहेत.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्ही.
जे. एन. टी., एस. बी. सी. प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न ४८ हजार रुपयांच्या आत
किंवा दारिद्र्यरेषेखालील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराच्या नावे
३ हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी, त्याच्या सातबारा उताऱ्यामध्ये विहिरीची,
सिंचनाची नोंद असावी किंवा शेताशेजारी नदी, नाला किंवा धरण असल्याचा तलाठ्याचा
दाखला असावा. यापूर्वी समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ
घेतलेला नसावा. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत
नसावा. लाभार्थ्याची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीस राहील. लाभार्थी
निवड झाल्यानंतर साहित्य खरेदी केल्यावर सदर साहित्य तो विकणार नसल्याचे, गहाण
ठेवणार नसल्याचे किंवा इतरांना भाड्याने देणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे
लागेल.
तरी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण
अर्ज व आवश्यक कागदपत्रे २२ जुलै २०१९ पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयात जमा
करावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात अथवा संबंधित
पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती पानुताई जाधव व जिल्हा समाज
कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment