शासकीय योजनांचा लाभ घेवून कृषि उत्पन्न वाढवा - हर्षदा देशमुख
·
कृषि
दिनी झाला शेतमाउलींचा सन्मान
·
खरीप
हंगामातील पिक नियोजनाबाबत मार्गदर्शन
वाशिम, दि. ०१ : कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील
शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ
घ्यावा. तसेच आपल्या शेतीती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून मिळणारे
उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. कृषि
दिनानिमित्त नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समितीचे
सभापती विश्वनाथ सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जि. प. सदस्य
गजानन अमदाबादकर, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे, जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषि विकास अधिकारी प्रल्हाद शेळके, डॉ.
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास
गौड, करडा कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ आर. एस. डवरे, महाबीजचे डॉ. घावडे, प्रगतशील
शेतकरी केशव भगत आदी उपस्थित होते.
पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा खंबीरपणे हाकणाऱ्या महिलांसह
कृषि क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला शेतकरी यांचा कृषि दिनाच्यानिमित्ताने
‘शेतमाऊली सन्मान सोहळा’ अंतर्गत सन्मान
करण्यात आला. यामध्ये यमुनाबाई नारायण उगले, आशाबाई वाठ, शांताबाई मच्छिंद्र
कुदळे, सरस्वती सुधाकर खंडागळे, साधनाबाई सुधाकर आवताडे, अरुणाबाई भीमराव राठोड,
नंदा सुनील पानबरे, कुसुमबाई घनश्याम मनवर, अनिता दिनेश भोयर, निशाताई जाधव,
ललिताबाई थुतांगे, सुलोचना बगाळे यांचा समावेश होता.
सौ. देशमुख म्हणाल्या, कृषि दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रे
व उपक्रमांमधून शासकीय योजना व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी याठिकाणी मिळणाऱ्या कृषि
क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपयोग शेतीमध्ये करावा. कृषि विकासासाठी
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेवून या योजनांचा लाभ
घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. सानप म्हणाले, कृषि क्षेत्राच्या विकासासाठी कै.
वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यासाठी कृषि दिनाचे आयोजन करण्यात
येतो. तसेच कृषि क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान केला जातो. आज
होत असलेल्या कृषि दिनात जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय
घेवून एक आगळा-वेगळा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या
विकासासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
श्री. अमदाबादकर यांनी ‘शेतमाऊली सन्मान सोहळा’ या
उपक्रमाची संकल्पना विषद केली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. गावसाने यांनी
कृषि विभागाच्या योजनांची माहिती दिली. खरीप हंगामातील पिक नियोजन या विषयावर
श्री. डवरे व डॉ. गौड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार
कृषि विकास अधिकारी श्री. शेळके यांनी मानले.
Comments
Post a Comment