वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीच्या प्राथमिक बैठकीत विविध विषयांवर चर्चा


वाशिम, दि. ३० :  वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या अनुषंगाने आज प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली व दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा जिल्हा गॅझेटियरच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा गॅझेटियरच्या संपादकीय मंडळाचे सदस्य प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे, ‘काव्याग्रह’चे विठ्ठल जोशी, प्रा. गजानन वाघ, मोहन शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, कृषि, उद्योग, बँकिंग, व्यापार, व्यवसाय, दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती यासह प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. या प्रत्येक विषयांवर स्वतंत्र प्रकरण जिल्हा गॅझेटियरमध्ये समाविष्ट असणार आहे. हे शासकीय प्रकाशन असल्याने व पुढील अनेक वर्षांसाठी हे जिल्हा गॅझेटियर उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने यामध्ये प्रत्येक बाबीची अधिक सखोल व अचूक माहिती समाविष्ट केली जाणार असल्याचे डॉ. बेलसेकर यांनी सांगितले. तसेच जिल्हा गॅझेटियरच्या अनुषंगाने संकलित करण्यात येणारी माहिती व त्याची पध्दती याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शासकीय विभागांनी व इतर अभ्यासकांनी जिल्ह्याच्या अनुषंगाने अचूक माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास असून याबाबतच्या सर्व नोंदी वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये येण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय माहिती संकलित करण्याचे काम केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी केल्या. तसेच वाशिम येथे सापडलेली प्राचीन नाणी व इतर वस्तूंची माहिती जिल्हा गॅझेटियरमध्ये आवर्जून समाविष्ट केली जावे, असे त्यांनी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर