वाशिम ग्रंथोत्सवात पुस्तक दुकानांना मोठा प्रतिसाद
‘महामानव’ व ‘वार्षिकी’ला मोठी मागणी
वाशिम, दि.
29 : महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या वत्सगुल्म नगरीतील रसिकांनी आज जिल्हा
ग्रंथोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेट देत विविध पुस्तके खरेदी
केली. नामांकित प्रकाशनांच्या ललित पुस्तकांसह ‘महामानव’
व ‘वार्षिकी 2017’ या
दोन पुस्तकांनाही ग्रंथोत्सवात मोठी मागणी होती.
पॉप्युलर
प्रकाशनासह अनेक नामवंत प्रकाशनांचे स्टॉल ग्रंथोत्सवात लावण्यात आले आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, सामाजिक
कार्यकर्त्या रजिया सुलताना यांच्यासह अनेकांनी या स्टॉलला भेट दिली. जिल्हा
माहिती कार्यालयातर्फेही ‘लोकराज्य’ व इतर प्रकाशनांचे स्वतंत्र दालन उघडण्यात
आले. यातील ‘महामानव’ या भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाला मोठी मागणी
होती. पहिल्या दोन तासातच या पुस्तकाच्या 40 प्रती विकल्या
गेल्या, अशी माहिती कार्यालयाचे दिलीप काळे यांनी दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात
आलेल्या ‘वार्षिकी 2017’
या पुस्तकाच्या अवघ्या दोन- तीन तासातच 25
हून अधिक प्रतींची विक्री झाली, असे विजय
राठोड यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक अत्यंत
उपयुक्त आहे. शासनाच्या विविध योजनांविषयीच्या माहितीचा तो अधिकृत दस्तावेज आहे.
त्यामुळेच या पुस्तकाला अधिक मागणी असल्याची प्रतिक्रिया विविध वाचकांनी व्यक्त
केली. ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, दि. ३० नोव्हेंबर रोजीही जिल्हा माहिती
कार्यालयाचे दालन सुरु राहणार आहे.
Comments
Post a Comment