वाशिम तालुका विधी सेवा समितीच्यावतीने रॅलीद्वारे कायदेविषयक जनजागृती




·        राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त विशेष उपक्रम
·        राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणविषयी दिली माहिती
·        लोककलावंत, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वाशिम, दि. १८ : राष्ट्रीय विधी सेवा दिवसानिमित्त दि. ९ ते १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वाशिम तालुका विधी सेवा समितीच्यावतीने कायदेविषयक जनजागृती व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज जनजागृती रॅली काढून नागरिकांपर्यंत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा येथून निघालेल्या या रॅलीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा वाशिम तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अभय मंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
यावेळी प्रथम जिल्हा न्यायाधीश के. के. गौर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सोनाली शाह, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दादाराव आदमने, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. बाकलीवाल, अॅड. दागडिया, अॅड. एस. के. उंडाळ, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशनचे राम शृंगारे, शंकर अंबेकर, प्रदीप सावरकर, अभिजित दुधारे, अभय तायडे, जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे संतोष गावंडे, माधव इंगोले, विजय जाधव, अस्मिता काटकर आदी उपस्थित होते.
रॅलीमध्ये सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, रामकृष्ण राठी विधी महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, सुशीलाबाई जाधव महाविद्यालयाचे विद्यार्थी व केशव डाखोरे, विलास भालेराव, मधुकर गायकवाड, सुशीला घुगे, प्रज्ञानंद भगत, बेबीनंदा कांबळे, विद्या भगत, धम्मपाल पडघान, दौलत पडघान आदी लोककलावंत सहभागी झाले होते. यावेळी रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी माहिती फलकाच्या माध्यमातून तर लोककलावंतांनी लोकगीतांच्याद्वारे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, प्राधिकरणाची कार्यपद्धती यासह लोकन्यायालय संकल्पनाविषयी माहिती देऊन जनजागृती केली.

रॅली दरम्यान चित्ररथ व माहिती पत्रकांच्या माध्यमातून कायदेविषयक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आले. जिल्हा वकील संघ, विधी स्वयंसेवक व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी वृंद यांनी नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप केले. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हा न्यायालय परिसरात आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे