जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

वाशिम, दि. २४ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा सभा जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी झाली. यावेळी शहरातील फुटपाथ दुरुस्ती, अवैध दवाखाने, वजन-मापे तपासणीसह अनधिकृत गतिरोधके आदी विषयांवर चर्चा झाली.
यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील देशमुख, शहर वाहतूक शाखेच्या ज्योती विल्हेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे उपसंचालक आर. एस. कदम, सहाय्यक वैद्यामापनशास्त्र कार्यालयाचे बी. बी. गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे एम. बी. मडके, अशासकीय सदस्य रमेशचंद्र बज, गजानन साळी, सुधीर घोडचर, वीरेंद्र देशमुख, वीरेंद्रसिंह ठाकूर, अभय खेडकर आदी उपस्थित होते.
वाशिम शहरातील रस्त्यांची व फुटपाथची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्त्याचे काम झाल्यानंतर बाजूचे फुटपाथची उंची वाढविणे आवश्यक असल्याचा मुद्दा अशासकीय सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी नगरपरिषदेने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. जिल्ह्यात बोगस डॉक्टर व अवैध दवाखाने आढळून येत असून याबाबत धडक मोहीम उघडण्यात यावी, अशी मागणीही अशासकीय सदस्यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यात वजन-माफे तपासणी नियमित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
यापूर्वी झालेल्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी अवैध गतिरोधके, जिल्हा क्रीडा संकुल येथे स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे, बोगस बियाणेप्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आदी मुद्दे उपस्थित केले होते. या मुद्द्यांवर संबधित विभागांकडून सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती या सभेत देण्यात आली.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे