महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाची ‘महाखादी यात्रा’ वाशिम शहरात दाखल




·        जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन
·        खादी व ग्रामोद्योगी वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन
वाशिम, दि. ३० :  महाराष्‍ट्र राज्‍य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या १५० व्‍या जयंतीनिमित्‍त  राज्‍यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.  या यात्रेला दि. ९ ऑक्‍टोबर २०१७ रोजी मुंबई येथील राजभवन येथून सुरुवात  झाली असून ही महाखादी यात्रा आज वाशिम शहरात दाखल झाली. या महाखादी यात्रेनिमित्त पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथील सभागृहात तीन दिवस खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रदीप पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ता. ना. खांडेकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. वानखडे उपस्थित होते.
महाखादी यात्रेनिमित्त दि. २ डिसेंबर २०१७ पर्यंत पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सुतकताई यज्ञ, महात्‍मा गांधी यांचे काळातील चरख्‍यापासून ते अद्ययावत चरखे, मध उद्योगाचे प्रात्‍यक्षिके व ग्रामोद्योगी उत्पादने ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी खादी व ग्रामोद्योग वस्तूच्या दालनांना भेटी देऊन याठिकाणी ठेवण्यात आलेल्या चरखे, ग्रामोद्योगांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती घेतली . तसेच याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ग्रामोद्योगांच्या विविध उत्पादनानांची माहिती खरेदी केली. त्यानंतर याठिकाणी आयोजित सूत कताई यज्ञात सहभागी होऊन लाकडी चरख्यावर पारंपारिक पद्धतीने सूत कताई केली.

खादी व ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या उद्योगांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाखादी यात्रा उपयुक्त ठरणार आहे. यामुळे खादी, मध उद्योग व विविध ग्रामोद्योग याविषयी जिल्ह्यातील नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार युवकांनी खादी व ग्रामोद्योगविषयी आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन याप्रकारचे उद्योग आपल्या जिल्ह्यातही सुरु करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे