दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप



·        वाचन चळवळ वाढीसाठी झाले विचारमंथन
·        काव्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम, दि. ३० :  राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील एस. एम. सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायणजी जोशी सभागृह येथे आयोजित दोन दिवशीय ‘ग्रंथोत्सव २०१७’ चा आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे, प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे आदी उपस्थित होते. या ग्रंथोत्सवामध्ये आयोजित परिसंवाद, मुलाखतीमधून वाचन चळवळीच्या अनुषंगाने विचारमंथन झाले.ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे स्वयंसेवक व सार्वजनिक वाचनालयांचे प्रतिनिधी यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. ठाकरे म्हणाले, राज्य शासनामार्फत आयोजित केला जाणारा ग्रंथोत्सव हा अतिशय चांगला उपक्रम आहे. यामुळे ग्रामीण भागातील लेखक, कवी यांना व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच ग्रामीण भागातील वाचन चळवळ वाढीस लागण्यामध्ये ग्रंथोत्सवाचा मोलाचा वाटा आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाचन चळवळ अधिक बळकट करण्याचे काम होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बदलत्या काळानुसार या वाचनालयांचे अद्यायावतीकरण होऊन ग्रामीण वाचकांपर्यत दर्जेदार साहित्य पोहचविले जावे, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. क्षीरसागर यांनी बदलत्या जीवन शैलीमध्ये वाचन बाजूला पडत असल्याची खंत व्यक्त केली. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे मानुष घडतो. वाचनामुळेच आपल्यावर सुसंस्कार होतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, असे प्रा. क्षीरसागर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड यांनी केले तर आभार अजय शिरसाट यांनी मानले.
काव्य वाचनाला श्रोत्यांची भरभरून दाद

ग्रंथोत्सवाचा दुसऱ्या दिवशी जेष्ठ कवी कलीम खान यांच्या अध्यक्षतेखाली काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शेषराव धांडे, चाफेश्वर गांगवे, महेंद्र ताजणे, डॉ . विजय काळे, हंसिनी उचित यांनी आपल्या कवितांचे वाचन केले. या काव्यवाचनाला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. कवी कलीम खान यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या गझल सादर केल्या. त्यांच्या ‘मरणही माझे भुईला कुंकवाचे दान आहे’ या गझलला टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश