जलयुक्त शिवार अभियानामुळे संरक्षित सिंचन क्षमतेत वाढ


·        वाशिम जिल्ह्यात सुमारे ७ हजार कामे झाली पूर्ण
·        ५१ हजार ५३ टीसीएम अतिरिक्त पाणीसाठा निर्माण
वाशिम, दि. ०७ : टंचाईमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने सन २०१५ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात केली. या अभियानाचे यंदाचे तिसरे वर्ष असून वाशिम जिल्ह्यात या अभियानांतर्गत आतापर्यंत ७ हजार ६७६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संरक्षित सिंचन क्षमतेत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
अभियानाच्या पहिल्याच वर्षी म्हणजेच २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांची अभियानामध्ये निवड करण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यातील २६, रिसोड तालुक्यातील २७, मालेगाव तालुक्यातील २५, मंगरूळपीर तालुक्यातील २७, मानोरा तालुक्यातील ६१ व कारंजा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश होता. या गावांमध्ये ५ हजार ५८ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ३५ हजार ३२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुमारे ७० हजारहेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे.
सन २०१६-१७ मध्ये जिह्यातील १४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. वाशिम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील १७, मालेगाव तालुक्यातील २४, मंगरूळपीर तालुक्यातील ३१, मानोरा तालुक्यातील २१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा यामध्ये  समावेश आहे. या गावांमध्ये २ हजार १२ कामे पूर्ण झाली असून १६ हजार २० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येकी २० गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये आतापर्यंत ६०६ कामे पूर्ण झाली. त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम पाणीसाठा तयार निर्माण झाला असून सुमारे ८ हजार १०० हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय होणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा अतिशय कमी पाऊस होऊन सुध्दा जलयुक्त शिवार अभियानामध्ये जमा झालेल्या कामांचा शेतकऱ्यांना खरीप हंगामात फायदा झाला. या कामामध्ये जमा झालेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी पावसाच्या खंड काळात सोयाबीन, तूर पिकासाठी सिंचन केल्याने ही पिके जिवंत राहून शेतकऱ्यांचे नुकसान नुकसान टळण्यास मदत झाली.
लोकसहभागातून ८१ कामे झाली पूर्ण
जलयुक्त शिवार अभियानाची उपयुक्तता व त्यामुळे मिळणारे प्रत्यक्ष फायदे लक्षात आल्यामुळे या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात लोकसहभागातून सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याची सुमारे ४७ कामे करण्यात आली. याद्वारे ५ लाख घन मीटरपेक्षा अधिक गाळ उपसण्यात आला. तसेच सन २०१६-१७ मध्ये लोकसहभागातून गाळ उपसण्याची ३४ कामे पूर्ण झाली, त्याद्वारे ६ लक्ष घन मीटरपेक्षा अधिक गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने आपल्या शेतामध्ये नेऊन टाकल्याने त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली. गाळ उपसा केल्याने प्रकल्पाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होऊन सिंचन क्षमता वाढण्याबरोबरच शेतजमिनीची सुपीकता सुध्दा वाढल्याने शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे