भामदेवीतील ‘वऱ्हाड दूध’ची उत्पादने पोहचली दिल्लीतील प्रदर्शनात





·        ‘युएनडीपी’च्यावतीने आयोजित ‘ग्रीन हाट’ प्रदर्शन
·        देशभरातून शेतमाल आधारित उत्पादनांचा समावेश
वाशिम, दि. ०१ : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्ह्याला मिळालेल्या २ कोटी रुपये विशेष निधीतून भामदेवी (ता. कारंजा) गावाचा सर्वांगीण विकास होत आहे. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून याठिकाणी दुग्ध व्यवसायाला चालना देण्यात येत असून येथील भामदेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून ‘वऱ्हाड दूध’ हा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. ‘वऱ्हाड दूध’ची उत्पादने आता दिल्लीत पोहचली असून केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्यावतीने दि. ३१ ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रीन हाट’ प्रदर्शनात ही उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी गावातील एकूण ५६ लाभार्थ्यांना १७२ म्हशींचे अनुदानावर वाटप करण्यात आले आहे. गावामध्ये उत्पादित होणाऱ्या दुधाला चांगला मोबदला मिळावा, याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भामदेवी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून १००० लिटर क्षमतेचे दूध प्रक्रिया केंद्र भामदेवी येथे सुरु झाले आहे. जुलै २०१७ मध्ये संस्थेने स्वतःचा ‘वऱ्हाड दूध’ हा ब्रँड तयार केला. तसेच त्याला भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाणन प्राधिकरण अर्थात ‘एफएसएसएआय’ (FSSAI) परवाना प्राप्त करून घेतला. ‘वऱ्हाड दूध’ नावाने प्रक्रिया केलेल्या दुधाची पॅकिंग करून विक्री करण्यास सुरुवात केली.  कारंजा लाड या तालुक्याची ठिकाणी संस्थेचे दूध विक्री केंद्र सुरु करण्यात आले. संस्थेने आता दुधाबरोबरच तूप, दही, पनीर, खवा, चक्का आदी पदार्थ बनविण्यास सुरुवात केली आहे.
भामदेवी येथे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची पाहणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यु.एन.डी.पी.)चे कार्यक्रम व्यवस्थापक प्रभज्योत सोधी यांनी दि. १४ ऑक्टोंबर रोजी भामदेवीला भेट दिली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, ‘संवर्धन’ संस्थेचे निलेश हेडा, सरपंच सुभाष मोहकार यांनी गावात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती त्यांना दिली. यावेळी श्री. सोधी यांनी ‘वऱ्हाड दूध’च्या माध्यमातून उत्पादित केली जाणारे उत्पादने ‘ग्रीन हाट’ प्रदर्शनाकरिता पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली व संवर्धन संस्थेचे डॉ. निलेश हेडा यांच्या सहकार्याने भामदेवी येथील ‘वऱ्हाड दूध’चे उत्पादन असलेले ५० किलो शुद्ध तूप, भिवरी येथील मशरूम पदार्थ, कामरगाव येथील शेतकऱ्यांची मुग डाळ घेऊन भामदेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेचे प्रदीप येवतीकर व गणेश सावरकर हे या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. 'ग्रीन हाट' प्रदर्शन दि. ३१ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पर्यावरण व वने मंत्रालय परिसरात तर दि. २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राजघाट समोर आयोजित करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश