वाशिम येथे ‘ग्रंथोत्सव २०१७’चे थाटात उद्घाटन








• ग्रंथ दिंडीद्वारे वाचनाविषयी जनजागृती
• ग्रंथ प्रदर्शन स्टॉलला वाचकांचा प्रतिसाद
राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील एस. एम. सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायणजी जोशी सभागृह येथे आयोजित ‘ग्रंथोत्सव २०१७’ चे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते आज थाटात उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हरिभाऊ क्षीरसागर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सहाय्यक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, अमरावती येथील लेखिका रजिया सुलताना, कादंबरीकार बाबाराव मुसळे, राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव तथा कार्यकारी संपादक डॉ. दि. प्र. बलसेकर, सावित्रीबाई फुले महिला विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती देशमुख म्हणाल्या, आजच्या सोशल मिडीयाच्या युगातही पुस्तके, ग्रंथ वाचनाचे महत्त्व कायम आहे. ग्रंथ वाचनामुळे आपल्याला इतिहासातील घटना, त्यामागील कारणे आदींची माहिती मिळते. त्यामुळे इतिहासात झालेल्या चुका टाळून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होते. आजच्या युगात ई-बुकच्या रूपाने ग्रंथ आपल्याला उपलब्ध होत आहेत. बदलत्या काळात ग्रंथांचे बदलते स्वरूप स्वागतार्ह आहे. या आधारे प्रत्येकाने आपली वाचनाची आवड जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, जीवनात ज्ञान प्राप्त करायचे असल्यास पुस्तक वाचनाला सर्वोच्च महत्त्व आहे. ग्रंथ वाचनातूनच अनेक महान व्यक्तिमत्त्व घडली आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन ही त्यापैकी काही उदाहरणे आहेत. पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद हा आपल्याला कोणत्याही इतर वाचनातून मिळत नाही. त्यामुळे आजच्या डिजिटल युगातही मुद्रित पुस्तकांचे महत्त्व कायम आहे. तसेच ज्ञानार्जानाला सुद्धा पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी त्यांना पाठ्यपुस्तके वाचनाबरोबरच इतर चांगल्या लेखकांची पुस्तके वाचनास प्रेरणा द्यावी. प्रत्येकाने नवीन येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरवातील पुस्तक वाचनाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत आयोजित ग्रंथोत्सवामुळे लोकांमध्ये ग्रंथ प्रेम निर्माण होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील म्हणाले की, ग्रंथ हे आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक समाज जीवनाची माहिती देतात. ग्रंथ वाचनाने आपल्याला विविध घटना अनुभवता येतात. त्यामुळे आपल्या जाणीवा प्रगल्भ बनतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून ग्रंथ वाचनाला वेळ दिला पाहिजे, असे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या, वाचनाला पर्याय नाही. रोजचे वृत्तपत्र जरी वाचले तरी आपल्या ज्ञानात भर पडते. पुस्तक वाचनाने आपल्याला संघर्षाची प्रेरणा मिळते. आज किंडल, ई-बुक, विकिपीडियाच्या माध्यमातून वाचनासाठी साहित्य उपलब्ध होत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्येकाने जीवनात अपडेट रहावे, असे श्रीमती पाटील यांनी सांगितले.
‘महत्त्व गॅझेटियरचे’ या विषयवार बोलताना डॉ. दि. प्र. बलसेकर म्हणाले, वाशिम जिल्ह्याच्या गॅझेटियरचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने माहिती संकलनाचे काम सुरु आहे. या गॅझेटियरच्या अनुषंगाने वाचकांना वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण माहितीचा ठेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा गॅझेटियर निर्मितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
अमरावती येथील लेखिका रजिया सुलताना यांनी ग्रंथ वाचन व लेखन याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणल्या, लेखक हा लेखक असतो. त्याला कोणताही जात, धर्म नसतो. तसेच त्याचे लेखनही कोणत्या जाती, धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. त्यामुळे वाचकांनी या लिखाणाचा निखळ आस्वाद घेतला पाहिजे. वाचनाने आपले विचार प्रगल्भ बनतात व अनुभव समृद्ध होतात. ग्रंथ आपल्याला विचार देतात. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथांवर प्रेम करायला हवे, असे श्रीमती सुलताना यांनी सांगितले.
कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी ग्रंथ लेखनाच्या अनुषंगाने लेखकाची भूमिका मांडली. लेखकाने ग्रंथ लिहिताना त्याचा वाचकांना काय फायदा होईल, याचाही विचार केला पाहिजे. लोकांमध्ये वाचनाची आवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयांनी प्रयत्न करावेत.
प्रा. हरिभाऊ क्षीरसागर म्हणाले, वाचन हे आपणास तारते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविणे आवश्क आहे. चांगले समाजमन घडविण्यासाठी चांगल्या ग्रंथांचा प्रसार होणे आवश्यक असून यासाठी ग्रंथोत्सव उपयुक्त ठरेल, असे प्रा. क्षीरसागर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड यांनी तर जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी आभार मानले. यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे