प्रत्येक पदवीधर मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



·        ओळखपत्र म्हणून १४ दस्ताऐवज ग्राह्य धरणार
·        मतदान वैध ठरण्यासाठी पहिला पसंतीक्रम देणे आवश्यक
वाशिम, दि. ३० : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पदवीधर मतदाराने यावेळी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, मतदान नोंदविण्यासाठी मतदान केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांकडून जांभळ्या शाईचा स्केचपेन पुरविण्यात येईल. त्या पेनने आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावाच्या पुढे ‘१’ हा अंक भारतीय, रोमन किंवा मराठी अंक पध्दतीनुसार लिहून आपले मत नोंदविणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही प्रकारची खुण अथवा अक्षरे लिहू नये अथवा नाव, स्वाक्षरी, नावाची अद्याक्षरे किंवा अंगठ्याचा ठसा उमटवू नये. आपले मत वैध ठरण्यासाठी मतपत्रिकेवरील कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ असा अंक दर्शविणे आवश्यक आहे. इतर प्राधान्य क्रम देणे ऐच्छिक राहील. मात्र एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावापुढे ‘१’ अंक लिहिल्यास मतपत्रिका बाद होईल. आपल्या आवडीच्या उमेदवारांच्या नावासमोर ‘१’, ‘२’ असे क्रमांक देऊन प्राधान्यक्रम दर्शिवता येतील.
मतदान ओळखपत्राबरोबरच पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक प्राधिकरण यांचे ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याचे फोटो असलेले पासबुक, स्थावर मालमत्ता यांचे नोंदणीकृत फोटो असलेले दस्ताऐवज, फोटो असलेले रेशनकार्ड, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र ज्यावर फोटो आहे, शस्त्राचे फोटो असलेले ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेले शारीरिक अपंगत्वाचे फोटोसह प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा एनपीआर अधिनस्त आरजीआय यांनी प्रदान केलेले स्मार्ट कार्ड याचा वापर मतदान केंद्रावर प्रवेशासाठी करता येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदार संघाच्या निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. मतदान केंद्राविषयी माहिती मिळविण्यासाठी सर्व तहसीलदार कार्यालयात सहाय्यता कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून हे अधिकारी मतदारांना त्यांचा अनुक्रमांक, मतदान केंद्र याविषयी माहिती देतील. प्रत्यक्ष निवडणुकीदिवशी या अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. त्याद्वारे हे अधिकारी www.washim.amtgraduate.com या सर्चइंजिनच्या सहाय्याने मतदारांना मतदान केंद्राविषयीची माहिती देतील. मतदारांनाही या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाच्या आधारे मतदान केंद्राची माहिती शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
स्वयंसेवी संस्थांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा
मतदार जागृतीसाठी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नुकत्याच आयोजित करण्यात आलेली ‘वाशिम मिनी मॅरेथॉन-२०१७’ विविध स्वयंसेवी संस्थांच्या उत्स्फूर्त सहकार्याने यशस्वी झाली. त्याप्रमाणेच आता पदवीधर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी केले.
******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे