वाशिम येथे सात हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारली ‘स्वच्छ भारत अभियान’च्या लोगोची मानवी शृंखला !





·        ' गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'ने घेतली दखल
वाशिम, दि. २६ :  'ना गंदगी करेंगे ,ना करने देंगे ' असाचा मंत्र घेऊन वाशिम शहरातील ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज प्रजासत्ताक दिनी ‘स्वच्छ भारत अभियान’चा बोधचिन्ह (लोगो) असलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याची मानवी शृंखला साकारली. जिल्हा प्रशासन व वाशिम नगरपरिषदेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची दखल विश्व विक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने घेतली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमाप्रसंगी वाशिम शहरातील ३० शाळा, महाविद्यालयातील ७ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी ‘स्वच्छ भारत अभियान’च्या जनजागृतीसाठी एकत्र जमले होते. वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो असलेला महात्मा गांधींच्या चष्म्याच्या आकाराची मानवी शृंखला साकारली.
स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाची दखल विश्व विक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने घेतली. या संस्थेचे प्रतिनिधी अलोक कुमार यांनी मानवी शृंखलेचे परीक्षण केले. या मानवी साखळीत ७ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून यापूर्वीचे सर्व विक्रम यामुळे मोडीत निघणार असल्याचे अलोक कुमार यांनी यावेळी सांगितले. तसेच या उपक्रमाची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने नोंद घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा प्रशासन व वाशिम नगरपरिषदला दिले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आलेल्या चित्रीकरणाचे परीक्षण केल्यानंतर या उपक्रमाची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये घेतली जाणार असल्याचे अलोक कुमार यांनी यावेळी सांगितले.

मानवी शृंखलेमध्ये सहभागी झालेल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कौतुक केले व स्वच्छतेच्या कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश