आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके तैनात - अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे



·         अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
वाशिम, दि. १२ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून जिल्ह्यात या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर स्थायी निगराणी पथक, व्हीडीओ पाहणी पथक व व्हीडीओ सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आल्याचे अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पी. एस. पाटील उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले की, आदर्श आचारसंहितेच भंग झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षालाही देता येईल. वाशिम जिल्ह्यात १८ हजार ७३६ पदवीधर मतदार आहे. जिल्ह्यात २९ मतदार केंद्र असणार आहेत, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर एक सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्झर्व्हर) नियुक्त केले जाणार आहेत. तसेच एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच दि. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी मतमोजणी होईल.
प्रिंटींग प्रेस मालकालाही ठेवावा लागणार प्रचार साहित्य छपाईचा हिशोब

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षाचे बॅनर्स, भिंती पत्रके, डमी मतपत्रिका, तसेच इतर निवडणूक विषयक प्रचार साहित्यावर प्रकाशकाचे नाव, प्रति यासह मुद्रक व छापखान्याचे नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती छापणे बंधनकारक आहे. तसेच छपाई केलेल्या बॅनर्स, भिंती पत्रके, डमी मतपत्रिका, तसेच इतर निवडणूक विषयक प्रचार साहित्याच्या छपाईचा हिशोब ठेवणे मुद्रक मालक (प्रिंटींग प्रेस मालक) यांना बंधनकारक असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे