रोखरहित व्यवहारासाठी ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय निवडा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी




·         वाशिम येथील डिजीधन मेळाव्यात मार्गदर्शन
·         व्यापारी वर्गाने रोखरहित व्यवहारासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान
वाशिम, दि. १२ : काळा पैसा व करचोरीला आळा घालून अर्थव्यवस्था सक्षम बनविण्यासाठी रोखरहित व्यवहार वाढविणे आवश्यक आहे. याकरिता डिजिटल पेमेंट हा सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय असून नागरिकांनी या पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. वाशिम तहसीलदार कार्यालयाच्यावतीने येथील पाटणी कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे आयोजित ‘डिजीधन मेळावा’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक पार्थसारथी पात्रा, सह महाव्यवस्थापक श्री. गांगरस, जिल्हा अग्रणी बँक-स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक व्ही. एच. नगराळे, तहसीलदार बळवंत अरखराव, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, पेट्रोलपंपधारक संघटनेचे अध्यक्ष अनिल केंदळे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर काळे, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, रोखरहित व्यवहारामुळे कर चुकवेगिरीला आळा बसणार असून जास्तीत जास्त कर जमा झाल्याने देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनण्यास मदत होईल. त्यामुळे रोखरहित व्यवहाराला सर्वसामान्य नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे. रोखरहित व्यवहारासाठी डिजिटल पेमेंट हा सर्वात सोपा मार्ग आहे. मात्र डिजिटल पेमेंटविषयी पुरेशी माहिती नसल्याने अनेकांच्या मनात भीती व संभ्रम आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये ‘डिजीधन मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे.
बँकांमार्फत देण्यात येणारी विविध कार्डस, मोबाईल बँकिंग, एईपीएस, मिक्रो एटीएम, युपीआय, वॉलेटस, पीओएस हे डिजिटल पेमेंटची माध्यमे आहेत. या माध्यमांविषयी नागरिकांना सविस्तर व योग्य माहिती मिळाल्यास त्यांची डिजिटल पेमेंट विषयीची भीती, संभ्रम दूरू होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व बँकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. वाशिम शहरातील व्यापारी मंडळींनीही याकामी पुढाकार घेऊन शहरातील बाजारपेठेमध्ये चालणारे अधिकाधिक व्यवहार डिजिटल पेमेंटद्वारे करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यावेळी केले.
उपविभागीय अधिकारी कु. डोंबे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ‘डिजीधन मेळावा’ आयोजनाचा हेतू विषद केला. श्री. पात्रा, श्री. गांगरस, श्री. नगराळे, श्री. कोठारी, श्री. वैद्य यांनी यावेळी उपस्थितांना डिजिटल पेमेंटविषयी मार्गदर्शन करून जास्तीत जास्त व्यवहार रोखरहित करण्याचे आवाहन केले. या मेळाव्यामध्ये विविध बँक, महा ई-सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार, पेट्रोलपंपधारक व गॅस वितरकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामाध्यमातून मेळाव्याला भेट देणाऱ्या नागरिकांना डिजिटल पेमेंटबाबत मार्गदर्शन केले जात होते. सूत्रसंचालन नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार बळवंत अरखराव यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे