प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी




·        वाशिम येथे २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
·        वाहतूक नियमांविषयी होणार जनजागृती
·        सलग पंधरा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन
वाशिम, दि. ०९ : देशामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातामध्ये होतात. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहन चालविताना अथवा रस्त्यावरून चालताना वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड, रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य डॉ. हरिष बाहेती आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान व वाहतूक नियमांविषयी माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकांचे विमोचन करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, देशात रस्ते अपघातामुळे सुमारे सव्वा दोन लाखापेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडतात. दहशतवादी हल्ला अथवा इतर दुर्धर आजारामध्ये होणाऱ्या मृत्यूपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. सर्वाधिक रस्ते अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होतात. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्युंमुळे संबंधितांच्या कुटुंबाचे व पर्यायाने देशाच्या मनुष्यबळाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास रस्ते अपघातांवर नियंत्रण आणता येणे शक्य आहे. यासाठी सर्वसामान्य नागरिक व वाहनधारकांनी स्वतःहून पुढाकार घेण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संकल्प करावा, तसेच इतरांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. होळकर म्हणाले की, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होणार नाहीत. तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याबरोबरच प्रत्येक वाहनधारकाने आपल्या वाहनाची व्यवस्थित निगा राखणे आवश्यक आहे. नादुरुस्त वाहनांमुळे सुद्धा अपघाताला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वाहनाची नियमित तपासणी केल्यानंतरच ते वाहन वापरत आणले पाहिजे. वाहतूक पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा दल स्थापन करण्यात येत आहे. यामाध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाहेती म्हणाले, रस्ता सुरक्षा ही अतिशय महत्वाची आहे. त्याकरिता प्रत्येकाने आपल्या मानसिकतेमध्ये बदल करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
प्रास्ताविकामध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान राबविण्या येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनीही यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या स्वकीयांना रस्ता सुरक्षेचे महत्व पटवून द्यावे व त्यांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाहनांना रिफ्लेक्टर लावून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली.
आपले जीवन अनमोल आहे, त्याला जपा - जिल्हाधिकारी
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे होय. वाहन चालविताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळे जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या जिवापेक्षा मौल्यवान काही नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आपले जीवन अनमोल आहे, ते जपण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे