‘डिजिटल पेमेंट’साठी व्यावसायिक, बँकांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
·
मालेगाव
येथे डिजी धन मेळावा
·
रोखरहित
व्यवहाराविषयी जनजागृती
·
महा ई-सेवा
केंद्रचालकांना ‘पीओएस’चे वाटप
वाशिम, दि. १० : रोखरहित व्यवहारासाठी ‘डिजिटल पेमेंट’
हा सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय असून यामाध्यमातून होणारे व्यवहार वाढविण्यासाठी
विविध क्षेत्रातील व्यावसायिक व बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
राहुल द्विवेदी यांनी केले. मालेगाव येथील जुने बस स्थानक परिसरात तहसीलदार
कार्यालयाच्यावतीने आयोजित डिजी धन मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपविभागीय
अधिकारी डॉ. संदीपान सानप व तहसीलदार रमेश जसवंत आदी उपस्थित होते. या
मेळाव्यामध्ये रोखरहित मेळाव्याची माहिती देण्यासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक,
विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेन्ट्रल बँक, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, आपले सरकार सेवा
केंद्र व महा ऑनलाईन केंद्र, महावितरण, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून स्टॉल
उभारण्यात आले होते. तसेच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मोबाईल एटीएमद्वारे
उपस्थितांना डिजिटल पेमेंटविषयी माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री.
द्विवेदी म्हणाले की, काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी रोखरहित व्यवहाराला
प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करबुडवेगिरीला आळा घालणे हा सुध्दा
रोखरहित व्यवहाराचा एक उद्देश आहे. ‘डिजिटल पेमेंट’ हे रोखरहित व्यवहार करण्याचे
सर्वात सोपे माध्यम आहे. नव्यानेच सुरु करण्यात आलेले ‘भिम’ अॅप तसेच बँकांमार्फत देण्यात येणारी विविध कार्डस, मोबाईल बँकिंग, एईपीएस, मिक्रो
एटीएम, युपीआय, वॉलेटस, पीओएस प्रणालीद्वारे डिजिटल पेमेंट करता येते.
इंटरनेटची सुविधा नसलेल्या साध्या
मोबाईल फोनवरूनही मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करता येते. डिजिटल
पेमेंटविषयी जनजागृतीकरिता बँकांनी व व्यावसायिकांनी विशेष पुढाकार घेऊन लोकांना डिजिटल
पेमेंटच्या पर्यायाचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी
केले. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये डिजिटल पेमेंटसाठी आरटीजीएस
(RTGS) चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ. सानप म्हणाले की,
आज अधिकाधिक सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध होत आहेत. त्यामुळे डिजिटल पेमेंट ही काळाची
गरज बनली आहे. डिजिटल पेमेंटविषयीची माहिती जाणून घेऊन त्याचा वापर करण्याचा सर्वांनी
प्रयत्न करावा. रोख रक्कमेच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांपेक्षा रोखरहित,
डिजिटल स्वरुपात होणारे व्यवहार अधिक सुरक्षित आहेत.
प्रास्ताविकामध्ये तहसीलदार रमेश जसवंत
यांनी मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू विषद केला. ते म्हणाले की, डिजिटल पेमेंट विषयी
योग्य माहिती नसल्याने लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यामुळे या मेळाव्याच्या
माध्यमातून डिजिटल पेमेंटविषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्याचा प्रमुख उद्देश आहे.
संजय यादव, योगेश कुंटे, सागर भुतडा, भगवंत कुलकर्णी यांनी नागरिकांना डिजिटल
पेमेंटविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रशांत देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन निवासी
नायब तहसीलदार आर. जे. राठोड यांनी केले.
महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून
डिजिटल व्यवहार सुरु
ग्रामीण भागात डिजिटल व्यवहाराला
प्रोत्साहन देण्यासाठी महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटद्वारे
आर्थिक व्यवहार करण्याच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार आज मालेगाव
तालुक्यातील २७ महा ई-सेवा केंद्रांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते
पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले. या सर्व महा ई-सेवा केंद्रांवर आजपासून डिजिटल
पेमेंटद्वारे आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. तसेच शंभर रुपये ते एक हजार
रुपयांपर्यंत रोख रक्कम काढता येणार आहे.
Comments
Post a Comment