वाशिमचा अन्सार दर्गीवाले, नागपूरची शीतल भगत ठरले ‘वाशिम मिनी मॅरेथॉन २०१७’चे विजेते





·        राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
·        जिल्हा प्रशासन व विविध स्वंयसेवी संस्थामार्फत आयोजन
·        राज्यभरातून सुमारे ३५०० धावपटूंचा सहभाग
·        कलापथाकाद्वारे मतदार जागृती
वाशिम, दि. २५ : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाशिम मिनी मॅरेथॉन-२०१७’मध्ये पुरुष गटामध्ये वाशिमचा अन्सार दर्गीवाले तर महिला गटामध्ये नागपूरची शीतल भगत विजेती ठरली. अन्सार दर्गीवाले याने १२ किलोमीटरचे अंतर ३८मिनिटे ४२ सेकंदात पार केले तर शीतल भगत हिने ८ किलोमीटरचे अंतर ३६ मिनिटे ३८ सेकंदात पार केले. या मिनी मॅरेथॉनमध्ये राज्यभरातून सुमारे ३५०० पेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण पोलीस कवायत मैदान गजबजून गेले होते.
प्रारंभी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पुरुष गटाची मिनी मॅरेथॉन सुरु झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, रोहयो शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, वाशिमचे तहसीलदार बळवंत अरखराव, मालेगावचे तहसीलदार रमेश जसवंत, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बालासाहेब गोटे, मनीष मंत्री, सुनील बोंडे आदी उपस्थित होते.
पोलीस कवायत मैदान येथून सुरु झालेली पुरुष गटाची मिनी मॅरेथॉनची समाज कल्याण वसतिगृह चौक, जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस स्टेशन चौक, पुसद नाका, हिंगोली नाका, मन्नासिंग चौक, राजनी विहीर चौक, नगरपरिषद चौक, रमेश टॉकीज चौक, सुभाष चौक, काटी वेश, बालू चौक, छ. शिवाजी महाराज चौक, गोपाळ टॉकीज, जुना रिसोड नाका, रिसोड रोड, प्रोफेसर कॉलनी तेथून परत पाटणी चौक, अकोला नाका, आर. ए. कॉलेज, नवोदय विद्यालय, साखळी बाबा रोड येथून पोलीस कवायत मैदान येथे आल्यानंतर पुरुष गटाच्या १२ किलोमीटर अंतराच्या मिनी मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.
            पुरुष गटामध्ये वाशिमचा अन्सार दर्गीवाले (३८ मिनिट ४२ सेकंद) याने प्रथम क्रमांक पटकाविला. नागपूरचा शुभम मेश्राम (३८ मिनिट ५९ सेकंद) याने द्वितीय , वाशिमचा प्रकाश देशमुख (३९ मिनिट १९ सेकंद) याने तृतीय, परभणीचा कल्याण ढगे (३९ मिनिट २९ सेकंद) याने चतुर्थ, वाशिमचा आशिष सपकाळ (३९ मिनिट ४५ सेकंद) याने पाचवा, रिसोडचा समाधान गुगळे (४० मिनिट ११ सेकंद) याने सहावा तसेच जळगावचा जयेश चौधरी (४० मिनिट ३९ सेकंद), आसोलाचा सुरज जाधव (४० मिनिट ४७ सेकंद), अर्जुन साळवे (४० मिनिट ५४ सेकंद), विशाल कुंभार (४१ मिनिट ९ सेकंद) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
महिला गटासाठी ८ किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले होते. पोलीस कवायत मैदान येथून समाज कल्याण वसतिगृह चौक, जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस स्टेशन चौक, पुसद नाका, मन्नासिंग चौक, राजनी विहीर चौक, नगरपरिषद चौक, रमेश टॉकीज चौक, सुभाष चौक, काटी वेश, बालू चौक, छ. शिवाजी महाराज चौक, गोपाळ टॉकीज, जुना रिसोड नाका, पाटणी चौक, अकोला नाका, आर. ए. कॉलेज, नवोदय विद्यालय, साखळी बाबा रोड येथून पोलीस कवायत मैदान येथे आल्यानंतर महिला गटाच्या मिनी मॅरेथॉनचा समारोप झाला.
महिला गटामध्ये नागपूरची शीतल भगत (३६ मिनिट ३८ सेकंद) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. नागपूरची शीतल बाराई (३७ मिनिट १३ सेकंद) हिने द्वितीय, परभणीची कांचन म्हात्रे (३८ मिनिट ५२ सेकंद) हिने तृतीय, परभणीची परिमल बाबर (३९ मिनिट १५ सेकंद) हिने चतुर्थ, चिखली-बुलढाणा येथील अश्विनी जाधव (४२ मिनिट ३८ सेकंद) हिने पाचवा, नागपूरची प्रणाली बोरेकर (४३ मिनिट १६ सेकंद) हिने सहावा क्रमांक तसेच सावरगाव जिरे येथील मीना अंभोरे (४४ मिनिट ३६ सेकंद), नागपूरची अनिता भलावी (४५ मिनिट २ सेकंद), वाशिमची सविता लोखंडे (४५ मिनिट ४७ सेकंद), जयपूरची कल्याणी गादेकर (४६ मिनिट ९ सेकंद) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. 
विजेत्यांना ७४ हजार रुपयांच्या बक्षिसांचे वितरण
            ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’मध्ये पुरुष व महिला गटातील प्रथम सहा क्रमांकासाठी एकूण ७४ हजार रुपयांची रोख बक्षिसे,  स्मृतिचिन्ह, निवडणूक आयोगाचा लोगो असलेले टी शर्ट व प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये इंजिनीअर अँड कॉन्ट्रॅक्टर सुधीर जाधव आणि गिरीष लाहोटी यांच्याकडून दोन्ही गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस, पारिजात फॅशन्स व रिसोड येथील अजंटा इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी ९ हजार रुपयांचे बक्षीस, गजानन भालेराव व मनीष हार्डवेअर, देवकृपा कलेक्शन यांचेकडून तृतीय क्रमांकाचे प्रत्येकी ७ हजार रुपयांचे बक्षीस, डॉ. देवळे हॉस्पिटल व अकोला येथील प्रभात टी कंपनी यांचेकडून चतुर्थ  क्रमांकाचे प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस, दि अकोला जनता कमर्शिअल बँकेच्या वाशिम शाखेकडून पाचव्या क्रमांकाचे प्रत्येकी ३ हजार रुपयांचे बक्षीस दोनही बक्षिसे व सहाव्या क्रमांकाची प्रत्येकी २ हजार रुपयांची दोनही बक्षिसे अनसिंग येथील देवकृपा पेट्रोलपंप यांच्याकडून देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्रीय सहभागाने धावपटूंचा उत्साह द्विगुणीत
            राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित वाशिम मिनी मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी सुद्धा इतर धावपटूंसोबत पुरुष गटासाठी निश्चित करण्यात आलेले १२ किलोमीटरचे अंतर धावून मिनी मॅरेथॉन पूर्ण केली. स्वतः जिल्हाधिकारी आपल्यासोबत मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचे पाहून धावपटूंचा उत्साह द्विगुणीत झाला.
सहभागी धावपटूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
            मतदारांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करणायत आलेल्या मिनी मॅरेथॉनमध्ये राज्यभरातून सुमारे ३५०० धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये युवक-युवतीसोबतच शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मिनी मॅरेथॉनचे अंतर पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यांचे कौतुक केले. बारा वर्षाखालील पार्थ हेंबाडे, दिव्यांग धावपटू संतोष घुगे, सतीश जाधव, ५६ वर्ष वय पूर्ण करूनही १२ कि.मी. चा टप्पा पूर्ण केलेले मुकुंद हेमंतराव पवार, महिला धावपटू राधिका मंत्री यांचा येळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
धावपटूंना पाणी, सरबत व नाष्टा वाटप
            मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंकरिता राजा भैया पवार मित्र मंडळाच्यावतीने पोलीस कवायत मैदान येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. गो पर्यटक हॉलिडे होम्स व सिटी स्पोर्टस् क्लब, उमेश भैया मित्र मंडळ, राणा मित्र मंडळ, राजपूत युवा मंच व फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने पाणी, सरबत व नाष्टा वाटप करण्यात आले.
विविध क्रीडा व स्वयंसेवी संस्थांनी बजावली महत्वपूर्ण भूमिका
            ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’च्या आयोजनामध्ये जिल्हा प्रशासनाबरोबरच विविध स्वयंसेवी संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये मारवाडी युवा मंच, व्यापारी मंडळ, व्यापारी युवा मंडळ, रोटरी क्लब, सिंधी समाज, इंडियन मेडिकल असोसिएशन, माळी युवा मंच, जेसीआय वाशिम, दि अकोला जनता बँक वाशिम शाखा, एलआयसी वाशिम, छत्रपती शिवाजी रायडर्स फौंडेशन, वाशिम सायकलस्वार ग्रुप, रेडीओ वत्सगुल्म, छावा संघटना यांच्यासह सर्व पत्रकार समावेश होता. जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या पूर्ण टीमने मिनी मॅरेथॉनच्या मार्गावर मार्किंग करून दिल्याने धावपटूंना कोणतीही समस्या जाणवली नाही. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, क्रीडा अधिकारी संजय पांडे, जिल्हा समन्वयक राजेश बदर, स्वयंसेवी संस्था समन्वयक मनीष मंत्री यांनीही मिनी मॅरेथॉनकरिता विशेष परिश्रम घेतले. शहर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, धनंजय ठाकरे यांच्या चमूने व शहर वाहतूक शाखेने मिनी मॅरेथॉन मार्गावर चोख बंदोबस्त ठेवल्याने वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयानेही यांनीही याकरिता सहकार्य केले.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शपथ

            राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’च्या बक्षीस वितरण कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपस्थितांना लोकशाहीचे जतन करण्याची, कोणत्याही प्रभावाखाली न येता सजगपणे मतदान करण्याची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी शाहीर संतोष खडसे यांच्या चमूने कलापथकाच्या माध्यमातून मतदार जागृती करणारी लोकगीते सादर केली. संपूर्ण कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे