‘स्वच्छ भारत’साठी सुमारे ६ हजार विद्यार्थी येणार एकत्र - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


·        जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम

·        आज जिल्हास्तरीय ‘बालिका महोत्सव’

·        राष्ट्रीय मतदार दिनी ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’

वाशिम, दि. २३ : जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. २४ ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २४ जानेवारी रोजी बालिका महोत्सव, दि. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे. दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमास्थळी सुमारे ६ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत अभियान’च्या लोगोची निर्मिती करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, दि. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय बालिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे या महोत्सवाचे उदघाटन होईल. याठिकाणी सुमारे पाचशे विद्यार्थिनी एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा लोगो तयार करणार आहेत. सकाळच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धा व दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींचे शिक्षणयाविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे.
‘वाशिम मिनी मॅरेथॉन’मध्ये सहभागी व्हा
दि. २५ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ७ वाजता राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था यांच्यावतीने ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. यामधील विजेत्यांना एकूण सुमारे ७४ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. मिनी मॅरेथॉनमध्ये सर्वांना खुला प्रवेश असणार आहे, त्यामुळे सर्व वयोगटातील महिला व पुरुष यामध्ये सहभागी होऊ शकतील. इतर जिल्ह्यातील स्पर्धकांनाही यामध्ये सहभाग घेता येईल. महिला गटासाठी ८ किलोमीटर व पुरुष गटासाठी १२ किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. ही मिनी मॅरेथॉन यशस्वी झाल्यास प्रत्येक वर्षी राष्ट्रीय मतदार दिनी अशी मिनी मॅरेथॉन आयोजित केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रजासत्ताक दिनी प्रस्थापित होणार नवा विक्रम
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो मानवी साखळीद्वारे तयार केला जाणार आहे. यामध्ये शहरातील सुमारे ६ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही मानवी साखळी यशस्वी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रंगीत तालीम सुरु आहे. वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या संख्येने विद्यार्थी मानवी साखळीमध्ये सहभागी होत आहेत. हा उपक्रम नवा विक्रम स्थापित करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला.
विशेष ग्रामसभेमध्ये विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरावा
नीती आयोगामार्फत पुढील १५ वर्षांकरिता विकास कृती आराखडा बनविला जात आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दि. २६ जानेवारी रोजीच्या आपल्या गावामध्ये पुढील १५ वर्षांच्या दृष्टीने कृषी विकास, शिक्षण, रोजगार निर्मिती, आरोग्य व नागरीकरणविषयक कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा. त्यानुसार एका पानाचा अजेंडा तयार करून जिल्हास्तरावर सादर करावा. जिल्हास्तरावरून सर्व ग्रामपंचायतींचे विकास अजेंडा संकलित करून नीती आयोगाला पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे