‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देण्यासाठी वाशिम येथे विद्यार्थिनींची मानवी साखळी
· सुमारे ४४१ विद्यार्थिनींचा सहभाग
·
‘बालिका महोत्सव’ उत्साहात साजरा
·
जिल्हाभरातून ५५० पेक्षा अधिक मुली सहभागी
वाशिम, दि. २४ : केंद्र शासनाच्या
महिला व बाल विकास विभागाद्वारे आयोजित राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त वाशिम येथे जिल्हा
प्रशासनाच्यावतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान अंतर्गत ‘बालिका महोत्सव’चे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा संकुल येथे विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ,
बेटी पढाओ’ अभियानचा लोगो मानवी साखळीद्वारे साकारून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे व
मुलींना समान संधी देण्याचा संदेश दिला. याप्रसंगी आयोजित क्रीडा, सांस्कृतिक
कार्यक्रमात जिल्हाभरातून सुमारे ५५० विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या.
बालिका महोत्सवाचे उदघाटन जिल्हा
परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे
यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार,
महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. बालिका
महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता प्रत्येक तालुक्यातून पाचवी ते बारावी वर्गातील
किमान २५ विद्यार्थींनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी आयोजित सांस्कृतिक
कार्यक्रमामध्ये सामुहिक नृत्य, सामुहिक गायन स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच कब्बडी,
खो-खो व रस्सीखेच या क्रीडा
स्पर्धांमध्येही विद्यार्थिनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महिमा राठोडची कुस्ती ठरली आकर्षण
कुस्तीमध्ये १७ वर्षाखालील ४०
किलो वजन गटात राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावलेली पुसद येथील कुस्तीपटू
महिमा राजू राठोड हिची वाशिम येथील त्याचा वयोगट व वजनगटातील ओम दत्ता नांदणकर या
पैलवानासोबत कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. बालिका महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरलेल्या
या कुस्तीमध्ये दत्ता नांदणकरचा प्रत्येक डावपेच महिमा राठोडने यशस्वीपणे परतवून
लावला. कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांनी बरोबरीची झुंज दिली. नियोजित कालावधीमध्ये कोणताही
पैलवान चीतपट न झाल्याने ही कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली.
Comments
Post a Comment