वाशिम जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन !
विशेष वृत्त
वाशिम जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन !
३२६७ बचत गटांच्या माध्यमातून ३३ हजारांहून अधिक महिलांचे सक्षमीकरण
वाशिम, (जिमाका) महाराष्ट्र शासनाची महिला विकासासाठीची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या *महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)*ने वाशिम जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचा प्रभावी आणि व्यापक नमुना उभा केला आहे. सन २००२ पासून स्वयं सहाय्य बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य आज जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक उन्नतीचे भक्कम ‘इंजिन’ ठरत आहे.
जिल्ह्यातील सर्व ६ तालुक्यांमध्ये ‘माविम’कडून बचत गट स्थापनेचे व बळकटीकरणाचे काम सातत्याने सुरू असून, ३४५ गावांमध्ये *कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर (CMRC)*च्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाते. सध्या जिल्ह्यात एकूण १२ CMRC कार्यरत असून त्यापैकी एक शहरी भागात कार्यरत आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३२६७ बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये २८५७ ग्रामीण तर ४१० शहरी बचत गटांचा समावेश आहे. या बचत गटांमध्ये एकूण ३३ हजार ९७ महिला सदस्य सक्रिय असून, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि इतर घटकांतील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक शिस्त आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. सदस्यांनी आजपर्यंत १८.६२ कोटी रुपयांची बचत जमा केली असून, अंतर्गत कर्ज व्यवहार १६.३९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, बँकांकडून या बचत गटांना तब्बल २९४.२६ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. केवळ २०२५-२६ या वर्षातच १३३२ गटांना ५७.७२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘माविम’कडून विविध प्रकल्प प्रभावीपणे राबविले जात आहेत. नव तेजस्विनी (VSP) आणि तेजश्री प्रकल्पांतर्गत अनुक्रमे ६५ व १७५ गावांमध्ये काम सुरू असून, १३ हजारांहून अधिक अतिगरीब महिलांना सुमारे ११ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी २५,५६२ व्यवसाय सुरू केले असून, त्यामध्ये २१,२१४ शेतीआधारित तर ४,३४८ बिगर शेती व्यवसायांचा समावेश आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, किराणा दुकान, अन्न प्रक्रिया उद्योग अशा विविध उपक्रमांत महिलांनी यश मिळवले आहे.
‘माविम’अंतर्गत अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम (MWEP), Water.org, तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस, तसेच ‘लाडकी बहिण’ पतसंस्था आणि सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, स्मार्ट प्रकल्पांतर्गत ३ एफपीसी आणि १ एफपीओ स्थापन करण्यात आले असून, १७७६ सभासदांची ‘लाडकी बहिण को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ कार्यरत आहे.
जिल्हा मानव विकास आणि विविध शासकीय योजनांद्वारे २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत ६०१.५० लाख रुपयांचा निधी महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी देण्यात आला आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनांमधूनही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास सक्षम केले जात आहे.
एकूणच, ‘माविम’च्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि उद्योजकीय विकासाला नवी दिशा मिळाली असून, ग्रामीण महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात हे महामंडळ प्रभावीपणे यशस्वी ठरत आहे.
#नारीशक्तीवंदन
#NariShaktiVandhan
#NariShakti
#EmpoweringWomen
Comments
Post a Comment