लेक लाडकी’ योजनेतून महिला सक्षमीकरणाला बळ ;वाशिममध्ये ५ हजारांहून अधिक मुलींना लाभ


विशेष वृत्त 

लेक लाडकी’ योजनेतून महिला सक्षमीकरणाला बळ

वाशिममध्ये ५ हजारांहून अधिक मुलींना लाभ

वाशिम, (जिमाका)
मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांच्या शिक्षणाला बळकटी देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेची वाशिम जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळत आहे.

 जिल्ह्यातील हजारो मुलींना या योजनेचा थेट लाभ मिळत असल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ५११ पेक्षा अधिक मुलींचे अर्ज मंजूर झाले असून, त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) द्वारे पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तसेच २ हजार ९३१ अर्ज अनुदान वितरणाच्या प्रक्रियेत असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना विशेष लाभदायी ठरत आहे. अंगणवाडी स्तरावरून अर्ज नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांनाही या योजनेचा सहज लाभ मिळू लागला आहे.

या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत पाच टप्प्यांत दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिलीत प्रवेशानंतर ६ हजार, सहावीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असा लाभ देण्यात येतो. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात हलका होण्यास मदत होत आहे.
या योजनेचा लाभ वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत असलेल्या आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना मिळतो. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

जिल्हा प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की, ज्या कुटुंबांनी अद्याप आपल्या मुलींची नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन जन्म दाखला, रेशन कार्ड व बँक खात्याचे तपशील सादर करून अर्ज करावा.

मुलींच्या भविष्यासाठी ही योजना एक मोठी गुंतवणूक आहे. जास्तीत जास्त पात्र कुटुंबांनी याचा लाभ घेतल्यास कोणत्याही मुलीचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबणार नाही,
— संजय गणविर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, वाशिम)

#लेकलाडकीयोजना
#नारीशक्ती #नारीशक्तीवंदन #NariShaktiVandan
#NariShakti 
#EmpoweringWomen

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित