महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श ‘सीएमईजीपी’ योजनेतून मुक्ताताई घुगे यांची प्रेरणादायी यशोगाथा


महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श

 ‘सीएमईजीपी’ योजनेतून मुक्ताताई घुगे यांची प्रेरणादायी यशोगाथा

वाशिम, (जिमाका)
महिला सक्षमीकरण ही संकल्पना आत्मनिर्भरतेकडे नेणारी एक सशक्त चळवळ आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहत इतरांनाही रोजगार देणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, हीच या परिवर्तनाची खरी ओळख ठरत आहे.

याचाच प्रत्यय वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील उद्योजिका मुक्ता अमित घुगे यांच्या यशोगाथेतून येतो.
 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा उद्योग उभारून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे.

मुक्ता घुगे या गेल्या दोन वर्षांपासून स्क्रब घासणी व्यवसाय करत होत्या. सुरुवातीच्या काळात अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही त्यांनी हार न मानता नव्या उमेदीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

 उद्योग संचालनालय, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सीएमईजीपी योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती पुनम घूले यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने उद्योग उभारण्याचा निर्धार केला.

या योजनेअंतर्गत त्यांनी ‘समर्थ इंडस्ट्रीज, राजुरा’ या नावाने उत्पादन उद्योग सुरू केला. घासणी उत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून, स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी निर्माण झाली आहे. एकूण १९ लाख रुपयांच्या प्रकल्पातून त्यांनी उद्योग सुरू केला असून, त्यासाठी १८ लाख ५ हजार रुपये बँक कर्ज, ९५ हजार रुपये स्वगुंतवणूक आणि ६ लाख ६५ हजार रुपये अनुदान मिळाले आहे.

उद्योग सुरू झाल्यापासून त्यांच्या युनिटने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सध्या या उद्योगातून दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांची उलाढाल होत असून, निव्वळ वार्षिक नफा सुमारे २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या उद्योगामुळे ४ जणांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे, ज्यामध्ये कुशल व अकुशल कामगारांचा समावेश आहे.

मुक्ता घुगे सांगतात की, सुरुवातीला अडचणी आल्या, पण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमुळे नव्याने उभे राहण्याची संधी मिळाली. आज माझ्या उद्योगाने केवळ मला स्वावलंबी न बनवता इतरांनाही रोजगार दिला आहे.

 शासनाच्या या योजनेमुळे आमच्यासारख्या सामान्य लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली आहे.

त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि नवउद्योजकांसाठी नवा मार्ग खुला झाला असून, शासनाच्या योजनांचा योग्य उपयोग केल्यास यश निश्चित मिळू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.

#NariShaktiVandan #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #WomenEmpowerment #समाज_विकास

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित