शेतकरी गटांना नवे व्यासपीठ; ‘फार्मर ग्रुप लीग २०२६’ स्पर्धेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


शेतकरी गटांना नवे व्यासपीठ; ‘फार्मर ग्रुप लीग २०२६’ स्पर्धेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वाशिम, (जिमाका) शेतकऱ्यांच्या प्रगतीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘फार्मर ग्रुप लीग (FGL) २०२६’ या अनोख्या स्पर्धेचे भव्य उद्घाटन आणि स्पर्धेच्या लोगोचे अनावरण राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले.
यावेळी खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे, आ. सईताई डाहाके, आ. अमित झनक, तसेच विधानपरिषद सदस्य आ. भावना गवळी, आ. वसंत खंडेलवाल, आ. किरणराव सरनाईक, आ. बाबुसिंग महाराज राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, विभागीय कृषी सहसंचालक गणेश धोरपडे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट फार्मर गटांच्या माध्यमातून हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे हे आहे. उद्घाटनानंतर बोलताना ना. दत्तात्रय भरणे म्हणाले, बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये बदल करणे ही काळाची गरज आहे. फार्मर ग्रुप लीगच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन प्रगत तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि डिजिटल शेतीचा वापर करतील. यामुळे उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल.

स्पर्धेचे चार प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत –
कृषी तंत्रज्ञान विस्तार : आधुनिक यंत्रसामग्री व सुधारित बियाण्यांचा प्रसार.
क्षमता बांधणी : शेतकऱ्यांना गट पातळीवर प्रशिक्षित करून त्यांचे संघटन बळकट करणे.
डिजिटल शेती : मोबाईल अॅप्स आणि ऑनलाइन बाजारपेठेचा वापर वाढविणे.
नैसर्गिक शेती : जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतींना प्राधान्य.
‘ज्ञान, तंत्रज्ञान, एकता आणि शाश्वत शेती’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ही लीग वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गटांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. या स्पर्धेमुळे केवळ स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार नाही, तर एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन वाशिम जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागातर्फे करण्यात आले. १ मे ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, वाशिम तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले.

कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित