शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण'हळद तिखटाच्या' उद्योगातून घडविली यशाची 'चव'


शासन योजनेच्या बळावर महिला सक्षमीकरण

'हळद तिखटाच्या' उद्योगातून घडविली यशाची 'चव'

स्नेहल मंत्री यांची उल्लेखनीय झेप

वाशिम, (जिमाका) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आत्मविश्वास, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर यशाचा मार्ग कसा घडविता येतो, याचे प्रभावी उदाहरण सौ. स्नेहल लक्ष्मीकांत मंत्री यांनी निर्माण केले आहे. गृह उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत त्यांनी महिला उद्योजकतेचा आदर्श उभा केला असून स्वावलंबनासोबत रोजगारनिर्मितीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे.

 वाशिम तालुक्यातील काटा येथील रहिवासी स्नेहल मंत्री यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये बँकेकडून ८ लाख रुपयांचे कर्ज प्राप्त करून उद्योग उभारणीस प्रारंभ केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम यांच्या माध्यमातून २.८० लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याने उद्योगाला भक्कम आधार मिळाला.
या आर्थिक पाठबळाच्या सहाय्याने त्यांनी हळद, तिखट आणि विविध मसाल्यांच्या निर्मिती व प्रक्रियेचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मर्यादा, विक्री व्यवस्थेतील अडथळे, बाजारपेठेतील स्पर्धा आणि उत्पादनाला ओळख मिळविण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. मात्र, ध्येयाशी प्रामाणिक राहत त्यांनी प्रत्येक अडचण संधीमध्ये रूपांतरित केली.
उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री उभारून उत्पादन प्रक्रियेत आधुनिकता आणली. दर्जेदार उत्पादन, सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत विशेष प्रतिसाद मिळू लागला. कालांतराने त्यांच्या मसाला उत्पादनांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करत व्यवसायाला स्थिरता आणि विस्तार मिळवून दिला.
आज त्यांच्या उद्योगातून वार्षिक १२ ते १४ लाख रुपयांची उलाढाल होत असून १० ते १२ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होत इतरांच्या हातालाही काम देण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. त्यामुळे त्यांची वाटचाल केवळ उद्योजकतेपुरती मर्यादित न राहता महिला सक्षमीकरणाच्या व्यापक संकल्पनेला बळ देणारी ठरली आहे.
या यशप्रवासात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय वाशिम यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याची कृतज्ञ भावना स्नेहल मंत्री यांनी व्यक्त केली. शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर, परिश्रमाची जोड आणि आत्मविश्वासाची साथ असेल, तर महिला उद्योग क्षेत्रातही भक्कम यश मिळवू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.
ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत स्नेहल मंत्री यांची ही यशोगाथा महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित