जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करू पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे
जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करू
पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे
महादेव कुंड व बामणदरी प्रकल्पासाठी सकारात्मक पाऊल
वाशिम, (जिमाका) जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या किन्हीराजा प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.
किन्हीराजा गावातील महादेव कुंड व बामणदरी परिसराच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर व्हिडिओ व पीपीटी सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर करण्यात आले. या सादरीकरणात परिसरातील नैसर्गिक, ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्याची व्यापक संकल्पना मांडण्यात आली.
किन्हीराजा गावाचा महाभारतकालीन भद्रावती, वाकाटक व राष्ट्रकूट काळातील कंकावती असा समृद्ध ऐतिहासिक वारसा अधोरेखित करण्यात आला. समृद्धी महामार्गामुळे किन्हीराजा हे अनेक शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असून, येथे पर्यटन हब विकसित होण्याची क्षमता असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका मांडत आवश्यक बाबी अधोरेखित केल्या. या भागात पर्यटन विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री ना.श्री.भरणे यांनी वनपर्यटन प्रकल्पासाठी वनमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक मागण्या मांडण्याचे, कृषी विभागामार्फत कृषी पर्यटनासाठी सहकार्य उपलब्ध करून देण्याचे तसेच जिल्हा पर्यटन निधीतून आवश्यक विकासकामे टप्प्याटप्प्याने हाती घेऊ असेही यावेळी सांगितले.
महादेव कुंड व बामणदरी परिसराच्या विकासासाठी ओढ्यावर चेक डॅम (सीएनबी) बांधणे, कुंडाचे खोलीकरण व सुशोभीकरण, सुरक्षित पायऱ्या व प्रवेशमार्ग तयार करणे, दृश्य बिंदू, विश्रांती क्षेत्र व वाहनतळ सुविधा उभारणे, ट्रेकिंग मार्ग व कॅन्टीनसह पर्यटन सुविधा केंद्र उभारणे, तसेच झिपलाइन, रोप क्लाइंबिंग यांसारख्या साहसी पर्यटन उपक्रमांचा समावेश असलेल्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. परिसराचे सुशोभीकरण व पर्यटक सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.
राज्य क्षमता बांधणी कक्षाच्या वतीने राज्य समन्वयक निलेश घुगे यांनी सादरीकरण केले. या प्रकल्पामुळे किन्हीराजा व वाशिम जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात नवी ओळख मिळून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी संजय नागटिळक यांच्यासह कार्यक्रम व्यवस्थापक उपस्थित होते.
Comments
Post a Comment