अचूक माहिती हीच विकासाची पायाभरणी; जनगणना २०२७ यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक


अचूक माहिती हीच विकासाची पायाभरणी; जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद 

वाशिम,  (जिमाका) जनगणना ही केवळ आकडेवारी नसून शासनाच्या धोरणनिर्मितीची भक्कम पायाभरणी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक व प्रामाणिक माहिती देत या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जनगणना जिल्हा समन्वयक शशांक रूखने तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणनेच्या कार्यपध्दतीची संपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, जनगणना २०२७ करीता जिल्हाधिकारी यांची प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी तहसिलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांची चार्ज अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १२ चार्ज अधिकारी (६ तहसिलदार व ६ मुख्याधिकारी) कार्यरत आहेत.

जनगणना प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी, उपविभागीय अधिकारी, चार्ज अधिकारी, नायब तहसिलदार, जनगणना लिपीक व टेक्निकल असिस्टंट यांना दि. २६ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत तीन दिवसीय सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. राजेंद्र गवई यांची जिल्हा मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तालुकास्तरावर प्रशिक्षणासाठी एकूण ४२ फिल्ड ट्रेनर नेमण्यात आले आहेत. या फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण दि. ६ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान दोन तुकड्यांमध्ये घेण्यात आले आहे. सध्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दि. २३ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत ५० च्या तुकड्यांमध्ये तालुकास्तरावर सुरू आहे.
जनगणनेच्या कामासाठी शहरी भागात ४६९ प्रगणक व ८२ पर्यवेक्षक, तर ग्रामीण भागात १५४९ प्रगणक व २६१ पर्यवेक्षक अशी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय १० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ ठेवण्यात आले असून संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी एकूण २६०५ प्रगणक व पर्यवेक्षक कार्यरत आहेत.

स्वगणना टप्पा दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार असून नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरता येणार आहे. स्वगणना करताना घराचे अचूक स्थान नोंदविणे आवश्यक आहे. एकदा वापरलेला मोबाईल क्रमांक, कुटुंबप्रमुखाचे नाव किंवा निवडलेली भाषा बदलता येणार नाही. सबमिट केल्यानंतर मिळणारा SE ID सुरक्षित ठेवावा व प्रगणक घरभेटीवेळी तो उपलब्ध करून द्यावा.

घरगणना टप्पा दि. १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात घराची स्थिती, उपलब्ध सोयी-सुविधा आदी संदर्भातील एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. या प्रक्रियेदरम्यान प्रगणक कोणत्याही प्रकारचे कागदपत्र किंवा ओटीपी मागणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

 नागरिकांनी प्रगणकांचे स्वागत करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावीत तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणना पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी केले. प्रगणकांच्या ओळखीची खात्री त्यांच्या आयडी कार्डवरील क्युआर कोड स्कॅन करून करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार बांधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित