नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देवून बांधिलकी जोपासावी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देवून बांधिलकी जोपासावी
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम
वाशिम, (जिमाका) नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर, जबाबदार आणि पारदर्शक प्रशासन उभारण्याच्या उद्देशाने कार्य झाले पाहिजे. नागरिकांना शासकीय सेवा देताना विहित कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
लोकसेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, तहसीलदार निलेश पळसकर, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने शासकीय सेवा देण्यासाठी वचनबद्ध राहण्याची लोकसेवा हक्क शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले, शासकीय सेवेत काम करताना
पारदर्शकता, तत्परता आणि लोकाभिमुखता ही त्रिसूत्री कामकाजात प्रभावीपणे राबवावी. कुठल्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. सेवा हक्क अधिनियम केवळ कागदोपत्री न राहता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. असे आवाहनही श्री. कुंभेजकर यांनी यावेळी केले.
यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, नायब तहसीलदार रंजना गोरे, तलाठी दिपक लहाने यांचा समावेश होता.
कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादरीकरण जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांनी केले.
०००
Comments
Post a Comment