खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे
खरीप हंगामाचे यशस्वी नियोजन करून जल जीवन मिशन व आरोग्य योजनांची योग्य अंमलबजावणी करावी
पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे
वाशिम, (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शासन यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने व वेळेत काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खरीप हंगाम, जल जीवन मिशन तसेच विविध आरोग्य योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते, सिंचन सुविधा व कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करावी, तसेच पीक नियोजनाबाबत प्रभावी मार्गदर्शन देण्यात यावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये आणि खरीप हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थितीचाही आढावा घेऊन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकर व्यवस्था, जलस्रोत पुनर्भरण, विहिरी व बोअरवेलची पातळी तसेच ग्रामीण व शहरी भागातील पाणी उपलब्धता यावर विशेष भर देत आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
आरोग्य क्षेत्रातील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या अंमलबजावणीचा आढावाही घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, उपचार प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत आणि अधिकाधिक नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस खासदार संजय देशमुख, खा.अनुप धोत्रे, विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे, आ. सईताई डाहाके, आ. अमित झनक, तसेच विधानपरिषद सदस्य आ. भावना गवळी, आ. वसंत खंडेलवाल, आ. किरणराव सरनाईक, आ. बाबुसिंग महाराज राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती होती.
सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे व जिल्हा समन्वयक डॉ. पंकज बोरकर यांनी केले.
उपस्थित खासदार व आमदार यांनी मांडलेल्या प्रश्नांवरील अनुपालन अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सादर केला.बैठकीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या योजनांचा प्रगती अहवाल सादर केला. यावर पालकमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना देत काही योजनांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. स्थानिक अडचणी त्वरित सोडवून विकासकामे सुरळीत पार पाडावीत, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशिम जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून, विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment