‘नोव्हेल कोरोना’बाबत दक्षता घ्या - जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक
·
घाबरू नका; अफवांवर विश्वास ठेवू नका
·
हातांची नियमित स्वच्छता ठेवा;
गर्दीमध्ये जाणे टाळा
वाशिम, दि. ०५ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
राज्यात होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या तसेच आवश्यक खबरदारी
घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. नागरिकांनी नोव्हेल कोरोना विषाणूविषयी
घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी. या विषाणूचा संसर्ग टाळण्याचे उपाय सहज-सोपे
असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक
यांनी आज, ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर
यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
श्री. मोडक म्हणाले, नागरिकांनी स्वतःला व इतरांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित
ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हातांची नियमित स्वच्छता राखावी.
शिंकताना-खोकताना नाक-तोंडासमोर रुमाल धरावा. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, गंभीर स्वरुपाचे श्वसन
संस्थेचे आजार, अचानक येणारा तीव्र ताप, घसा येणे, गिळायला त्रास होणे, दम लागणे, निमोनिया यासारखी लक्षणे प्रामुख्याने आढळून
येतात. अशी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात जाणे टाळावे. तसेच ही लक्षणे
आढळणाऱ्या व्यक्तींनी त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन
त्यांनी यावेळी केले.
कोरोना
हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच मोठ्या
संख्येने लोक एकत्र येतील, असे समारंभ आयोजित करू नयेत व अशा समारंभांना उपस्थित
राहणे टाळावे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यावेळी म्हणाले.
जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रभाव हा व्यक्तीच्या वयावर
आणि रोग प्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे. मात्र आवश्यक खबरदारी घेतल्यास या विषाणूला
घाबरण्याचे कारण नाही. स्वच्छता हा यावरील सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असून
संसर्ग न झालेल्या सामान्य व्यक्तींनी मास्क लावणे अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या
खर्चिक साधनांचा वापर करण्याची आवश्यकता नाही. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या
व्यक्तींनी त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधावा. अशा रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात
स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून याठिकाणी आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध
असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. आहेर म्हणाले, सध्या आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही संशयित
रुग्ण आढळलेला नाही. तरीही या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी करावयाच्या
प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूसारख्या लक्षणावर
आधारित आजारावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून
न जाता, योग्य खबरदारी घ्यावी. याबाबतची लक्षणे आढळल्यास नागरीकांनी टोल फ्री हेल्प
लाईन क्रमांक 104, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978046 आणि राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष
क्रमांक 020-26127394 यावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
·
कोरोना
विषाणूबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी
-
साबणाने
व पाणी वापरुन हात स्वच्छ धुणे.
-
शिंकतांना, खोकतांना नाकावर, तोंडावर रुमाल अथवा टिश्यू
पेपर धरणे.
-
वापरलेला
टिश्यू पेपर ताबडतोब झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकावा.
-
सर्दी
व फ्ल्यू सदृष्य लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा.
-
गर्दीच्या
ठिकाणी, जास्त लोकांचा स्पर्श होणाऱ्या ठिकाणांचा वापर टाळावा.
-
हस्तांदोलन
करू नये. नाक, डोळे व चेहऱ्याशी हाताचा सततचा संपर्क टाळा.
-
मटन
व मास पूर्णपणे शिजवून घ्यावे.
-
सार्वजनिक
ठिकाणी थुंकणे टाळावे.
*****
Comments
Post a Comment