वाशिम जिल्ह्यातील शहरी भागात २३ मार्च पासून जमावबंदी आदेश लागू



·        जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने बंद
·        सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद
·        आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये
वाशिम, दि. २२ : राज्यात नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात २३ मार्च २०२० रोजीच्या सकाळी ५ वाजता पासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले असून ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमाव करता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात २२ मार्च रोजी रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू होता. तो २३ मार्च २०२० रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर २३ मार्च २०२० रोजीच्या सकाळी ५ वाजतापासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही.
किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने १०० टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ ५ टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश